TB and AIDS : कोविड काळात वाढले टीबी- एड्सचे रुग्ण | पुढारी

TB and AIDS : कोविड काळात वाढले टीबी- एड्सचे रुग्ण

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : TB and AIDS : कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यावर आरोग्य यंत्रणेने भर दिला. आणि याच महामारी दरम्यान अन्य आजाराचे मृत्यू वाढले. देशात 20 टक्के टीबीच्या तर 10 टक्के एचआयव्ही मृत्यूंमध्ये वाढ झाली. त्यामुळे पुन्हा एकदा टीबी आणि एचआयव्ही नियंत्रणात आणण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भारत सरकारच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन आणि एड्स सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडून करण्यात आले.

ड्रग सेन्स्टिटिव्ह आणि ड्रग रेजिस्टंट टीबीचे रुग्ण प्रामुख्याने आढळतात. एमडीआर आणि एक्सडीआर चे रुग्णांना लवकर औषधे लागू होत नसल्याने धोका वाढतो. एमडीआर प्रकारात जगातील 50 टक्के रुग्ण भारतात, भारतातील 25 टक्के महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील 50 मुंबईत आढळतात. त्यामुळे जागातील टीबीची राजधानी म्हणूनच जणू मुंबईची ओळख आहे. एमडीआर टीबीवरील उपचारपद्धती ही जास्त दिवस चालणारी आहे. त्यामुळे अनेक रुग्ण यामुळे उपचार सोडतात. तर जास्त दिवस उपचार घ्यावे लागत असल्याने त्याचे दुष्परिणाम देखील दिसतात.

टीबी आणि एचआयव्ही औषध जास्त काळ असल्याने टीबी आणि एड्स विषाणू औषधांना प्रतिसाद देत नाहीत. तसेच ते स्वतः बदल करून घेतात. त्यामुळे संक्रमणांवर उपचार करणे अधिक कठीण होते. उपचार जास्त दिवस होत असल्याने उपचाराचा खर्च वाढतो. औषधे लागू होत नसल्याने आजार गंभीर स्वरूप प्राप्त करतो त्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो. तर रुग्णांच्या वाढत्या खर्चामुळे आणि लांबलेल्या उपचारामुळे उपचार बंद केल्याने देखील रुग्ण मृत्यूमुखी पडतात. असे एड्स सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) चे अध्यक्ष डॉ ईश्वर गिलाडा सांगतात.

जगातील सर्व देशांनी 2030 पर्यंत एड्स आणि टीबी संपवण्याची तयारी दर्शवली. एड्सचे हे ध्येय गाठण्यासाठी फक्त 110 महिने बाकी आहेत. तर 2025 पर्यंत टीबी संपवण्यासाठी उद्दिष्ट आहे. फक्त 50 महिने शिल्लक आहेत. त्यामुळे कोविड नंतर पुन्हा जनजागृती आणि रुग्णांना औषधे घेण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी उपचार पद्धतीचा अवधी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी खासगी आणि शासकीय आरोग्य यंत्रणेने एकत्रित काम करण्याची गरज आहे. असे डॉ गिलाडा सांगतात.

रुबी हॉल क्लिनिक आणि पुणे हॉस्पिटलचे एचआयव्ही औषध आणि संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ.अमीत द्रविड म्हणाले की, डब्ल्यूएचओच्या जागतिक टीबी अहवालानुसार, भारतात 2019 मध्ये जवळपास 4.45 लाख टीबी मृत्यू झाले, ज्यात 9,500 एचआयव्ही ग्रस्त होते. देशात 2019 मध्ये एचआयव्ही ग्रस्त 71,000 लोक टीबीने आजारी पडले, त्यापैकी 44517 लोकांना सूचित करण्यात आले आणि त्यांच्यावर अँटीरेट्रोव्हायरल उपचारांवर केले गेले. 2019 मध्ये, भारतात 124000 नागरिकांना औषध-प्रतिरोधक टीबी झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. त्यापैकी केवळ 56,569 संभाव्य उपचारांवर केले गेले.

उपचार पद्धती कमी दिवस करावी, जनजागृती वाढवावी यासाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ सुदर्शन मंडल आणि एड्स सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) चे अध्यक्ष डॉ ईश्वर गिलाडा यांनी देशातील मल्टिड्रग-प्रतिरोधक टीबी आणि एचआयव्ही व्यवस्थापित करण्यासाठी एएसआय सल्लागार मंडळाच्या स्तरावर याबाबतची चर्चा केली.

मल्टीड्रग-रेझिस्टंट टीबी साठी नवीनतम अधिक प्रभावी, कमी दुष्परिणाम आणि कमी कालावधीच्या उपचार पद्धतींचा वेळेवर आणि तर्कशुद्ध वापर करण्याच्या गरजेवर भर दिला. जे एचआयव्ही सह संसर्गित लोकांसाठी देखील उपयोगी ठरतील. गोवंडी शताब्दी हॉस्पिटल उपचार पद्धतीचे मुख्य अन्वेषक, तसेच चेस्ट कन्सल्टंट, नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्राम ट्रेनर असलेले डॉ.विकास एस ओसवाल यांनी सांगितले

देशात एमबीपाल औषधोपचार पद्धती, गोवंडी शताब्दीत पहिल्या रुग्णांवर उपचार ( TB and AIDS )

मंगळवारी एमबीपाल औषधोपचार पद्धतीला भारतातील 9 ठिकाणी सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबईतील गोवंडी येथील पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका रुग्णालय, घाटकोपरचे सर्वोदय रुग्णालय तर लखनौमध्ये केजीएमयू, आग्रामध्ये एस.एन. वैद्यकीय महाविद्यालय, अहमदाबादचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, सुरतमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दिल्लीतील एनआयटीआरडी, आरबीआयपीएमटी, मदुराईतील राजाजी रूग्णालय या वैद्यकीय संस्थांचा समावेश आहे.

मात्र गोवंडी शताब्दी रुग्णालयातील एका रुग्णास ही मिश्र औषध पद्धती देऊन या उपचार पध्दतीचा वापर सुरू झाला असून रुग्ण संपूर्ण भारतातून ही औषधी घेणारा हा पहिला रुग्ण ठरला आहे. या उपचार पद्धतीमुळे एमडीआर आणि एक्सडी आर च्या रुग्णांना मिळणारा 21 ते 24 महिन्याच्या कालावधीची ट्रीटमेंट केवळ 6 महिन्यावर आली आहे. मुंबईत पालिका आणि आयसीएमआरच्या मदतीने ही उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे. गोवंडी शताब्दी हॉस्पिटल उपचार पद्धतीचे मुख्य अन्वेषक डॉ.विकास एस ओसवाल यांनी सांगितले.

टीबी आणि एड्सच्या उच्चाटनासाठी खासगी आणि शासकीय विभागाने एकत्र काम करावे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत उद्दीष्ट साध्य करणे शक्य होईल.
डॉ. ईश्वर गिलाडा,अध्यक्ष, एड्स सोसायटी ऑफ इंडिया

Back to top button