आमच्या प्रत्येकाच्या मनात पक्षाला शक्तीशाली करण्याचा विचार, अजित पवार यांच्या संदर्भातील चर्चेवर शरद पवार यांचे स्पष्टीकरण | पुढारी

आमच्या प्रत्येकाच्या मनात पक्षाला शक्तीशाली करण्याचा विचार, अजित पवार यांच्या संदर्भातील चर्चेवर शरद पवार यांचे स्पष्टीकरण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येकजण एका विचाराने चालत आहे. आमच्या प्रत्येकाच्या मनात पक्षाला शक्तिशाली करण्याशिवाय दुसरा कोणताही विचार नाही, जी काही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या कोणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आज सकाळी ते पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक मी मुंबई मध्ये बोलावलेली नाही. अशी कोणतीही बैठक ठरलेली नाही. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्या भागातील बाजार समितीच्या निवडणुकीच्या कामात आहेत. अजित पवारही त्याच कामात आहेत. या निवडणुकीची जबाबदारी या दोघांवरच आहे, बाकी कोणावरही नाही. मीदेखील माझे ठरलेले दौरे करत आहे, असेही पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार फुटून अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चेविषयी शरद पवार यांना विचारणा केली. त्यावर ‘मी एकदा विषय स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला त्यासंबंधी फाटे फोडण्याचा अधिकार नाही’, असे त्यांनी सांगितले.

Back to top button