आप्पासाहेबांनी उद्ध्वस्त कुटुंबांना दिशा देण्याचे काम केले : मुख्यमंत्री शिंदे

आप्पासाहेबांनी उद्ध्वस्त कुटुंबांना दिशा देण्याचे काम केले : मुख्यमंत्री शिंदे
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : धर्माधिकारी कुटुंबिय राज्यात गेल्या तीनशे-चारशे वर्षांपासून लोकांना दिशा देण्याचं काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. उद्ध्वस्त कुटुंबांना सावरण्याचे काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. आता सचिन धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहेत. माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (दि.१६) आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले की, 'पाहिला जनांचा सागर भरली ज्ञानाची घागर' असे सांगत जनांचा महासागर या ठिकाणी लोटलेला आहे. खरं म्हणजे सूर्य पूर्ण ताकदीने आग ओकतोय आणि याठिकाणी सकाळपासून भर उन्हामध्ये बसलेला एकही माणूस उठत नाही, ही आप्पासाहेबांची ताकद आहे. राजकीय सत्तेपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी असते. त्याचे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय. राजकीय अध्यात्मिक अधिष्ठानाची जोड, आशीर्वाद आणि प्रेरणा या ठिकाणी लागते, त्याचे जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

अथांग जनसागरामध्ये आप्पासाहेबांच्या रूपाने देव दिसतोय. नानासाहेबांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता. पण त्यांच्या निधनानंतर याच मैदानामध्ये आप्पासाहेबांनी स्वीकारला होता, त्याच मैदानामध्ये आज पुन्हा २०२२ चा महाराष्ट्र भूषण आप्पासाहेबांना देण्यात आला हा योगायोग आहे.

ज्यावेळेस माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यावेळी माझं कुटुंब उध्वस्त झालं होतं. त्यावेळेस मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांनी आधार दिला आणि आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन केले. दिशा दाखवली आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर आज मुख्यमंत्री नाही. तर एक श्री सदस्य म्हणून उभा आहे.

व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य शिबिर, जलसंधारण, ग्रामस्वच्छता, शिक्षण, मार्गदर्शन अशा सर्व मार्गांनी आप्पासाहेबांनी समाज घडविला आहे. त्यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठान हे मला एखाद्या दीपस्तंभासारखे वाटते, असे सांगत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केल्यामुळे महाराष्ट्राचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news