पुढारी ऑनलाइन डेस्क : महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा माझ्या एकट्याचा नव्हे तर हा आपल्या सर्वांच्या कष्टाचा गौरव सन्मान आहे. अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त करत आप्पासाहेब धर्माधिकारी Aappasaheb Dharmadhikari यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज ( दि. १६ ) आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव केला. मुंबई येथे हा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांसह त्यांचे लाखो अनुयायी उपस्थित होते.
यावेळी आप्पासाहेबांनी (Aappasaheb Dharmadhikari) उपस्थित लाखो अनुयायांना त्यांच्या अनमोल विचारांचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, हा आपल्या सर्वांचा कष्टाचा गौरव सन्मान आहे. यावेळी त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात खेड्यातून का केली याबाबत माहिती दिली. कार्य हे श्रेष्ठ असते. त्यामुळे माझे हे कार्य अखेरपर्यंत सुरु ठेवणार आहे. मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. त्यामुळे सर्वांनी मानवतेने वागले पाहिजे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या स्थापनेपासून आतापर्यंत प्रतिष्ठानमार्फत कोणकोणत्या प्रकारचे कार्य केले जाते याविषयी माहिती दिली. उपस्थित अनुयायांना मार्गदर्शन करताना म्हणाले, "प्रत्येकाने वृक्षारोपण केले पाहिजे. किमान ५ झाडे लावून ती जगवली पाहिजे. त्यांचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन केले पाहिजे. याशिवाय रक्तदान करणे हे खूप मोठे पुण्याचे काम आहे. प्रत्येकाने डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तदान करायला हवे, असे त्यांनी सांगितले. समाजसेवेसाठी प्रत्येकाने झटले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिले.
आप्पासाहेबांनी (Aappasaheb Dharmadhikari) पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला. महाराष्ट्र भूषण या पुरस्कारातून मिळालेले 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा आप्पासाहेबांनी केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले.
आप्पासाहेबांना पुरस्कार प्रदान सोहळ्यात अमित शहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, इतका मोठा जनसागर मी आजपर्यंत पाहिला नव्हता. असा भक्तिभाव फक्त आणि फक्त त्याग आणि सेवेतून निर्माण होतो. केवळ त्याग आणि समर्पणातून असा सन्मान मिळू शकतो.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, धर्माधिकारी घराणे गेल्या ३०० ते ४०० वर्षांपासून समाजाला ज्ञान दिशा देण्याचे काम करत आहे. आप्पासाहेबांनी लाखो कुटुंबांना योग्य दिशा दाखवण्याचे कार्य केले. लाखो कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले आहे. व्यसन, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न आप्पासाहेबांनी केला. माणसं जोडून माणुसकीचे महासागर निर्माण करण्याचे कार्य आप्पासाहेबांनी केले. आप्पासाहेबांना पुरस्कार दिल्यामुळे पुरस्काराचीच उंची वाढली आहे. महाराष्ट्राचा सन्मान वाढला आहे. लाखोंच्या संख्येत अनुयायी उपस्थित असणे ही आप्पासाहेबांची शक्ती आहे. राजकीय शक्तीपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी असते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोट्यवधी लोकांची प्रेरणा असलेल्या आप्पासाहेबांचे कार्य अफाट आहे. व्यसन मुक्ती, वृक्षारोपण, जलव्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत अप्पासाहेबांनी केलेले कार्य प्रचंड आहे. दासबोधाच्या निरुपणातून समाजात संस्कार पेरण्याचे कार्य त्यांनी केले आहे. मन स्वच्छ करण्याचे रसायन धर्माधिकारींच्या निरुपणात आहे. माणसाची श्रीमंती संस्कारातून दिसते. पुरस्कार देऊन सरकारने त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हेही वाचा :