[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
धारवाड : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते आणि हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे सहा वेळचे आमदार जगदीश शेट्टर यांनी भाजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. आज भाजपचे प्राथमिक सदस्यत्त्व आणि विधानसभा आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे शेट्टर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शेट्टर यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेट्टर नाराज आहेत. तीन दिवसांपूर्वी भाजपची पहिली यादी जाहीर होताच त्यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. शेट्टर हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना त्यानंतर दिल्लीला पाचारण करण्यात आले होते. तिथे त्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. मात्र नड्डा यांनी त्यांना नव्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी निवडणुकीतून बाजूला होण्याची विनंती केली. त्यामुळे दुखावलेल्या शेट्टर यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना शेट्टर म्हणाले, "तीन महिन्यांपूर्वी भाजपने मला राजकारणातून बाजूला होण्याची विनंती केली असती, तर मी तेव्हाच बाजूला झालो असतो. मात्र निवडणुकीची घोषणा होईपर्यंत मला काहीच सांगण्यात आलेले नव्हते आणि आता अचानक बाजूला होण्यास सांगण्यात येते आहे. उत्तर कर्नाटकात आम्ही वाढवलेल्या पक्षाकडून मलाही अपेक्षा नव्हती. हा आमच्या मेहनतीचा अनादर आहे. तरीही पक्षाकडून आतापर्यंत मला जे काही मिळालं त्याबद्दल मी आभारी आहे. उद्याच शिरशीला जाऊन विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहे."
शनिवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रल्हाद जोशी यांनी शेट्टर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची पुन्हा समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शेट्टर यांनीही भाजपला शनिवार रात्रीपर्यंतची वेळ दिली होती. या वेळेपर्यंत आपली उमेदवारी जाहीर न केल्यास पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत भाजपकडून काहीच घोषणा न झाल्याने त्यानंतर पत्रकार परिषद बोलावून शेट्टर यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
शेट्टर यांचा राजीनामा हा भाजपसाठी दोन दिवसातील दुसरा मोठा धक्का आहे. याआधी शुक्रवारी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपचे सदस्यत्व आणि विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शनिवारी लघवलग काँग्रेसने त्यांना अथनी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. भाजपवर नाराज असलेल्या शेतकऱ्यांच्यासाठीही काँग्रेसने एक मतदार संघ राखीव ठेवल्याचे समजते.