हरवलेले 12 लाखांचे दागिने महिलेला परत ; पोलिसांची 2 तासांत मोहीम फत्ते | पुढारी

हरवलेले 12 लाखांचे दागिने महिलेला परत ; पोलिसांची 2 तासांत मोहीम फत्ते

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : आयुष्यभर पै-पै करून पैसे साठवले, पतीला न सांगता आयुष्याची पुंजी गोळा करून सोने केले. मात्र, हे तब्बल 20 तोळे (12 लाख रुपयांचे) सोने हरवल्यानंतर त्या माउलीसमोर अंधारी दाटून आली. आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा मनात विचार आला. परंतु पोलिसांनी केवळ 2 तासांमध्ये हे सोने शोधून परत केल्याची घटना शिरूर येथे घडली. याबाबतची माहिती अशी की, देहू येथील लक्ष्मण व्यंकटराव नवटके (मूळ गाव – अहमदपूर, जि. लातूर) हे पत्नी कविता व मुलगा यांच्यासमवेत आपल्या गाडीने (एमएच 14 केजे 3926) शनिवारी (दि. 15) दुपारी पुण्याहून लातूरकडे चालले होते.

दुपारी दीडच्या सुमारास शिरूरजवळ आल्यानंतर एका पंपावर सीएनजी भरल्यानंतर लक्ष्मण यांनी एक बॅग डिक्कीत व्यवस्थित न ठेवल्यामुळे ती पडली. नंतर काही अंतरावर गेल्यानंतर एका दुचाकीस्वाराने तुमची बॅग पडली आहे, असे सांगितले. मात्र, वळून आल्यानंतर त्या ठिकाणी बॅग दिसली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता एक मालवाहतूक गाडीचा शोध घेत त्याची तपासणी केली असता त्यामध्ये हे सोने आढळून आले. सर्व खातरजमा केल्यानंतर हे सर्व दागिने कविता नवटके यांना देण्यात आले.

शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, सहायक फौजदार गोपीनाथ चव्हाण, पोलिस हवालदार उमेश भगत, पोलिस नाईक विनोद मोरे, अंमलदार. विनोद काळे, प्रवीण पिठले, नितेश थोरात, आकाश नेमाणे, बंडु कोठे आदींच्या पथकाने केवळ दोन तासांत ही मोहीम यशस्वी केली.

Back to top button