

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बंगल्यावर आले होते. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी हा दावा केला. शिंदे यांच्या बंडखोरीवर बोलत असताना त्यांनी दिेलेल्या या माहितीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे.
आदित्य ठाकरे हे विशाखापट्टणम येथील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. येथे एका प्रश्नाचं उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, "सध्याचे मुख्यमंत्री हे बंडापूर्वी काही दिवस आमच्या घरी (मातोश्री) आले होते. केंद्रीय तपास संस्था आता मला अटक करणार आहेत, असं म्हणत ते रडले होते. मला भाजपसोबत जावं लागेल, अन्यथा ते मला अटक करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती," असेही ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यावर आता वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या दाव्याबाबत उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत. मात्र तरीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिंदे गटासह भाजपच्या काही नेत्यांनी मात्र यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार शिरसाट आदित्य यांच्या विधानावर उत्तर देत म्हणाले की, मला असं वाटतं आदित्य साहेबांनी जो दावा केला आहे की, शिंदे साहेब मातोश्रीवर यायचे आणि रडायचे, त्यापैकी 'रडायचे' हे शब्द त्यांनी चुकीचे वापरले आहेत. कारण आम्ही सर्वच आमदार वारंवार उद्धव साहेबांना भेटायचो. आम्ही त्यांना सांगितलं होतं की, आम्हाला या आघाडीत राहायचं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आम्हाला त्रास देतात, सहकार्य करत नाहीत. निधीबाबत सहकार्य करत नाहीत. ही आमची भूमिका आम्ही उद्धवजींकडे मांडली होती.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, "उद्धव ठाकरेंची तुम्ही एक मुलाखत पाहा, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की 'मी एकनाथ शिंदे यांना बोलावलं होतं, त्यांना सांगितलं की तुम्हाला हवं तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मी मुख्यमंत्रिपद सोडतो, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. हे स्वतः उद्धव ठाकरे बोलले आहेत."
हेही वाचा