

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मालाड मढमधील उघडकीस आणलेल्या बेकायदा स्टुडिओ आणि जमीन घोटाळ्याची महापालिकेने दखल अखेर घेतली. बेकायदा बांधलेला आणि वादग्रस्त ठरलेल्या बालाजी तिरुपती सिनेमा नावाच्या स्टुडिओवर पालिका पी. उत्तर विभागाने शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान हातोडा फिरविला. जेसीबीच्या सहाय्याने स्टुडिओवर कारवाई करत तो जमिनदोस्त करण्यात आला. (BMC demolishes film studios)
गेल्या वर्षांभरांपासून भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून मढमधील ११ स्टुडिओविरोधात आवाज उठविला जात होता. यापैकी ६ स्टुडिओवर पालिका पी.उत्तर विभागाने कारवाई केली होती. परंतु ज्या स्टुडिओची सोमय्या यांनी स्थळ पाहणी केली होती. तो पाडण्यास दिरंगाई होत होती. याविरोधात सोमय्या यांनी येत्या शुक्रवारी मढमधील बालाजी स्टुडिओवर हातोडा मारणार असल्याचा इशारा दिल्यानंतर पालिका प्रशासन अलर्ट झाली. त्यांनी सोमय्या दाखल होण्याच्या आधीचं कारवाईला सुरुवात केली. यामुळे सोमय्या यांनीसुद्धा सदर कारवाईविषयी समाधान व्यक्त करून अखेर सत्याचा विजय झाल्याचे सांगितले. या कारवाई दरम्यान किरीट सोमय्या हे हातात हातोडा घेवून कारवाईचे समर्थन करतांना दिसून आले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "कमिशनर इक्बाल चहल यांना या बेकायदेशीर घोटाळ्याची माहिती होती. पण त्यांनी कारवाई केली नाही. आम्ही कोर्टात जाऊन बीएमसीला बेकायदेशीर बांधकामांना परवानगी कशी दिली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याची चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती केली." (BMC demolishes film studios)
हेही वाचा