

सूर्यकांत वरकड :
नगर : पुढारी वृत्तसेवा : भिंगार कॅन्टोमेंट बोर्डमध्ये 1984 नंतर निर्बंध आले आणि बहुमजली इमारतीचे स्वप्न भंगले. आता कुटुंबातील संख्या वाढल्याने घरे अपुरे पडू लागली परिणामी अनेक जण उपनगरामध्ये राहण्यास गेले. भिंगारचा महापालिकेत समावेश झाल्यास कदाचित बहुमजली इमारतीचे स्वप्न पूर्ण होईल. मिळकतीच्या किंमती वाढतील. शासकीय योजनाचा लाभही मिळेल, अशी आशा भिंगारकरांना आहे. अहमदनगर (भिंगार) कॅन्टोमेंट बोर्डमध्ये 1984 नंतर मोठ्या प्रमाणात बदल झाले. एफएसआयचा(चटई क्षेत्र) चा निर्णय ही त्याच काळात झाला.
कारण भिंगार शहराला जवळपास चारही बाजूंनी लष्काराची हद्द आहे. त्यामुळे परिसरात गर्दी होऊन नये म्हणून एफएसआय(चटई) क्षेत्राचे निर्बंध आले. सदन कमांड अंतर्गत येणार्या देशातील 15 कॅन्टोमेंट बोर्डमध्ये अशा प्रकारचे निबर्ंध आहेत. उर्वरित कॅन्टोन्मेंटमध्ये असे निर्बंध नाहीत. एखाद्या घर मालकची जमिनीवर 1000 स्वेअरफूट जागा असेल तर त्याने जमिनीवरच 1000 स्वेअरफूट घराचे बांधकाम करावे, अशी नियमावली आहे. पूर्वी त्याच जागेवर तीन मजली इमारत उभा करता येत होती. म्हणजे 3000 स्वेअरफूट बांधकाम करता येत होते. परंतु, एफएसआय(चटई) मुळे त्यावर निर्बंध आले आणि अनेकांचे दुमजली इमारत बांधण्याचे स्वप्न भंगले.
त्यामुळे अनेक वर्षांपासून भिंगारकराची एफएसआयचे निर्बंध हटवावे, अशी मागणी आहे. मात्र, आतापर्यंत सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आता महापलिकेत समावेश होणार असल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत. भिंगारमध्ये मोठे घर बांधता येत नसल्याने अनेकांनी सारसनगर, बाराभाबळी, आलमगीर परिसरात दुसरे घर घेतले आहे. भिंगारमध्ये दोन मजली घर बांधता आले तर, सर्व कुटुंब एकाच ठिकाणी राहू शकते. दरम्यान, महापालिकेत समावेश झाल्यानंतर मिळकतीचे हस्तांतर प्रक्रिया सोपी होणार आहे. तर, मिळकतीच्या किमतीही वाढतील. सध्या हस्तांतर प्रक्रिया प्रचंड किचकट असल्याने नागरिकांना त्याचा मनस्ताप होतो. तसेच, दर तीन वर्षांनी घरपट्टी वाढते म्हणजे घरपट्टीचा बोजा वाढत चालला आहे. त्यात तुलनेत सुविधा मिळत नसल्याची खंतही नागरिकांची आहे.
पूर्वी भिंगार नगरपालिका होती. आता स्वतंत्र नगरपालिका झाल्यानंतर भिंगारच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यास आम्ही सर्वपक्षीय बैठक घेणार असून, त्यावर चर्चा करणार आहोत. महापालिकेत समावेश झाल्यास एफएसआयसाठी लष्कराच्या काय अटी शर्ती राहतील त्यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे.
– बाळासाहेब पतके, भिंगार