Share Market Updates | RBI च्या निर्णयानंतर शेअर बाजाराचा यू-टर्न! बँकिंग स्टॉक्स तेजीत | पुढारी

Share Market Updates | RBI च्या निर्णयानंतर शेअर बाजाराचा यू-टर्न! बँकिंग स्टॉक्स तेजीत

Share Market Updates : तीन दिवसांच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीने आज गुरुवारी (दि.६) रेपो दरात (repo rate) कोणतीही वाढ केली नसल्याचे जाहीर केले. रेपो दर ६.५ टक्के एवढाच कायम राहणार असल्याचे RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी म्हटले. फेब्रुवारीमध्ये झालेल्या शेवटच्या पतधोरण बैठकीत आरबीआयने पॉलिसी रेट म्हणजेच रेपो रेट २५ बेसिस पॉइंट्सने वाढवून ६.५० टक्के केला होता. तो कायम ठेवण्यात आला आहे. यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने आज सुरुवातीचा तोटा मागे टाकत तेजीच्या दिशेने चाल केली. सुरुवातीला सेन्सेक्स १०० अंकांहून अधिक घसरला होता. पण आरबीआयच्या पतधोरण निर्णयानंतर शेअर बाजारात तेजी परतली. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सेन्सेक्स सुमारे २१५ अंकांनी वाढून ५९,९०० वर पोहोचला. तर निफ्टी १७,६०० वर गेला.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांक घसरले होते. बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला होता. पण आरबीआयच्या निर्णयानंतर निफ्टी PSU Banks आणि रियल्टी सुमारे १ टक्क्यांनी वाढले.

सकाळी ११ च्या सुमारास सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, एसबीआय, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, लार्सेन हे टॉप गेनर्स होते. तर एचसीएल टेक, नेस्ले, टायटन, आयटीसी, टेक महिंद्रा हे टॉप लूजर्स होते. निफ्टीवर बजाज फायनान्स, अदानी एंटरप्रायजेस, एसबीआय, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह हे तेजीत होते. तर ओएनजीसी, एचसीएल टेक, ब्रिटानिया, नेस्ले, कोल इंडिया घसरले होते. (Share Market Updates)

पतविषयक धोरण निश्चित करताना आरबीआयची पतधोरण समिती विशेषतः किरकोळ चलनवाढ तसेच अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंड आदी विकसित राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदरवाढीबाबत घेतलेली भूमिका या प्रमुख घटकांचा विचार करते.

चालू र्आथिक वर्ष २०२३-२४ साठी जीडीपी वाढ ६.५ टक्के राहील, असा अंदाज RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे. बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय व्यवस्था सुस्थितीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एकूणच सध्याची महागाई लक्ष्यापेक्षा अधिक आहे; यामुळे सध्याचे पतधोरण अनुकूल असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सध्याची आर्थिक स्थिती लवचिक आहे आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

 

Back to top button