मुंबई : महापरिनिर्वाणदिनानिमित्त शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज आहेत. दादर व आसपासच्या परिसरात सुमारे पाच हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, बेवारस वस्तूंना हात लावू नये, त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, आवश्यक प्रसंगी नागरिकांनी पोलीस मदतीसाठी 100 व 112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांकडून तीन अतिरिक्त पोलीस आयुक्त, आठ पोलीस उपायुक्त, एकवीस सहायक पोलीस आयुक्त, 492 पोलीस अधिकारी, 4640 पोलीस अंमलदार तसेच वाहतूक नियमनासाठी मुंबई पोलिसांकडून स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबत महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा कॉम्बॅक्ट, बीडीडीएस पथक आदींना बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे. बंदोबस्तात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सक्त इशाराच पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
वाहतूक बदल
वाहतूक पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दादर परिसरातील काही मार्गांवर एकेरी वाहतूक तर काही मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी पार्किंगला पूर्णपणे बंदी ठेवण्यात आली आहे.
चोरट्यांवर लक्ष
गर्दीचा फायदा घेऊन काही भुरटे चोरटे सोनसाखळी, पाकीटमारी करीत असल्याने साध्या वेशातील काही पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. शिवाजी पार्क परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. Mahaparinirvan