Stock Market Closing | सेन्सेक्सची १ हजार अंकांची उसळी, गुंतवणूकदार ३.७४ लाख कोटींनी श्रीमंत, ‘हे’ ५ घटक ठरले महत्त्वाचे | पुढारी

Stock Market Closing | सेन्सेक्सची १ हजार अंकांची उसळी, गुंतवणूकदार ३.७४ लाख कोटींनी श्रीमंत, 'हे' ५ घटक ठरले महत्त्वाचे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारात तेजी राहिली. जागतिक सकारात्मक संकेत तसेच एनर्जी, बँकिंग, फायनान्सियल आणि टेक्नॉलॉजी स्टॉक्समधील तेजीमुळे सेन्सेक्स आजच्या व्यवहारात १ हजारहून अधिक अंकांनी वाढला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०० हून अधिक अंकांनी वाढून ५८,६७२ वर पोहोचला होता. तर निफ्टी १९७ अंकांनी वाढून १७,२७७ वर होता. त्यानंतर दुपारच्या सत्रात सेन्सेक्स १ हजार अंकांनी वाढून ५८,९५० वर गेला. तर निफ्टीने १७,३५० ची पातळीच्या वर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स १,०३१ अंकांच्या वाढीसह ५८,९९१ वर बंद झाला. निफ्टी २७२ अंकांनी वाढून १७,३५३ वर स्थिरावला. (Stock Market Closing)

आज रिलायन्स, बँकिंग आणि आयटी हे दिग्गज स्टॉक्स सर्वाधिक तेजीत राहिले. आज सर्वच क्षेत्रात चौफेर खरेदी दिसून आली. बाजारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांना ३.७४ लाख कोटींचा फायदा झाला. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल कालच्या २५४.७१ लाख कोटींवरून आज २५८.४५ लाख कोटींवर पोहोचले.

३,५९० शेअर्सपैकी २,५३४ शेअर्स आज वाढले. ९५५ शेअर्समध्ये घसरण झाली तर १०१ मध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. सेन्सेक्सवर एचसीएल टेक, रिलायन्स आणि टेक महिंद्रा हे टॉप गेनर्स होते. आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड, नेस्ले, एम अँड एम आणि टाटा स्टील हे देखील ‍वधारले आहेत. दरम्यान, एशियन पेंट्स, सन फार्मा आणि आयटीसी हे शेअर्स घसरले. दुपारच्या सत्रात रिलायन्स, आयसीआयसीआय, इन्फोसिस, टीसीएस, एचडीएफसी बँक, एलटी आणि कोटक महिंद्रा हे आघाडीवर होते. भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स सुमारे ७ टक्क्यांपर्यंत वाढला. संरक्षण मंत्रालयाने या कंपनीसोबत २६.९६ अब्ज रुपयांचा करार केल्यामुळे हा शेअर वाढला. दरम्यान, JSW एनर्जीचे शेअर्स सुमारे ४ टक्के वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकात बँकिंग आघाडीवर

बँकिंग स्टॉक्समध्ये फेडरल बँक (२.९८ टक्के वाढ), आरबीएल बँक (२.९१ टक्के वाढ), आयसीआयसीआय बँक (२.८४ टक्के वाढ), बँक ऑफ बडोदा (२.७१ टक्के वाढ), करूर वैश्य बँक (१.८७ टक्के वाढ), आयडीएफसी फर्स्ट बँक (१.३८ टक्के वाढ), बंधन बँक (१.२६ टक्के वाढ), इंडसइंड बँक (१.११ टक्के वाढ), आयडीबीआय बँक (१.११ टक्के वाढ) या शेअर्सची कामगिरी चांगली राहिली.

IT स्टॉक्सही वधारले

IT मध्ये MphasiS (४.२९ टक्के वाढ), सोनाटा सॉफ्टवेअर (१०.९६ टक्के वाढ), Coforge (३.२८ टक्के वाढ), इन्फोसिस (२.९१ टक्के वाढ), टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (१.८३ टक्के वाढ), एचसीएल टेक्नॉलॉजीस (१.८१ टक्के वाढ), टेक महिंद्रा (१.७७ टक्के वाढ) हे शेअर्स टॉप गेनर्स होते.

क्षेत्रीय पातळीवर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक वाढले. फायनान्सियल, ऑटो, एफएमसीजी, मीडिया, मेटल, फार्मा, रियल्टी, कन्झुमर ड्यूरेबल्‍स आणि ऑईल व गॅस हे स्टॉक्सही वधारले होते. (Stock Market Closing)

रिलायन्स शेअरची दमदार कामगिरी

रिलायन्स इंडस्ट्रीज हा निफ्टीवरील टॉप गेनर्स होता. आजच्या व्यवहारात हा शेअर ३.५ टक्क्यांनी वाढून २,३१५ रुपयांवर पोहोचला. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ग्राहक आणि व्यापारी कर्ज देणारा व्यवसाय सुरू करण्याची योजना आखत आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्सचे शेअर्स वधारले आहेत.

जागतिक बाजारातील स्थिती काय?

चीनमधील मजबूत आर्थिक आकडेवारीच्या जोरावर आशियाई शेअर बाजार आज वधारले. जपानच्या निक्केई २२५ निर्देशांकाने १ टक्क्याने वाढला. हाँगकाँगचा हँग सेंग १.५ टक्क्यांने वधारला. टॉपिक्स निर्देशांकही वाढला होता. टेक्नॉलॉजी क्षेत्राशी संबंधित शेअर्सच्या वाढीमुळे अमेरिकेतील बाजारात तेजी राहिली. डाऊ जोन्स ०.४ टक्के, एस अँड पी ०.६ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट ०.७ टक्क्याने वाढला. तर बायडेन प्रशासनाने जोखीम कमी करण्यासाठी कडक उपाय सुचविल्यामुळे अमेरिकेतील बँक शेअर्स घसरले.

परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीवर जोर

बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) १,२४५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. तर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ८२३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

रुपयाला चालना

परदेशी निधीचा ओघ आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत २४ पैशांनी वाढून ८२.१० वर होता. सहा चलनांच्या तुलनेत डॉलर इंडेक्स १०२ अंकाच्या आसपास व्यवहार करत होता.

हे ही वाचा :

Back to top button