RBI रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची वाढ करु शकते, अर्थतज्ज्ञांचे मत | पुढारी

RBI रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची वाढ करु शकते, अर्थतज्ज्ञांचे मत

पुढारी ऑनलाईन डेस्क : किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या कम्फर्ट पातळीच्या वर राहिला आहे. तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हसह जगभरातील बहुतांश मध्यवर्ती बँकांनी व्याजदरवाढीबाबत कठोर भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आरबीआय ६ एप्रिल रोजी द्वि-मासिक पतधोरण धोरण जाहीर करणार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील पहिले द्वि-मासिक पतधोरण जाहीर करण्यापूर्वी विविध देशांतर्गत आणि जागतिक घटकांचा विचार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (Monetary Policy Committee -MPC)) ३, ५ आणि ६ एप्रिल रोजी तीन दिवस बैठका होणार आहे.

पुढील पतविषयक धोरण निश्चित करताना आरबीआयची पतधोरण समिती विशेषतः किरकोळ चलनवाढ तसेच अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंड आदी विकसित राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदरवाढीबाबत घेतलेली भूमिका या दोन प्रमुख घटकांचा विचार करेल.

रशिया-युक्रेन युद्धाच्या उद्रेकानंतर जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे महागाई वाढली. या पार्श्वभूमी मे २०२२ पासून आरबीआय (RBI) बेंचमार्क दर वाढवत आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या शेवटच्या पतधोरण बैठकीत आरबीआयने पॉलिसी रेट म्हणजेच रेपो रेट २५ बेसिस पॉइंट्सने वाढवून ६.५० टक्के केला होता. दोन महिने (नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२) रेपो रेट सहा टक्क्यांच्या खाली राहिल्यानंतर किरकोळ महागाई दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर गेला. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई दर जानेवारीमध्ये ६.५२ टक्के आणि फेब्रुवारीमध्ये ६.४४ टक्के होता.

आरबीआयची तटस्थ भूमिका

“गेल्या दोन महिन्यांत सीपीआय महागाई दर ६.५ टक्के आणि ६.४ टक्के होता आणि तरलता स्थिर पातळीवर आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआय रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढू करु शकते. एकूणच आरबीआयची भूमिका तटस्थ राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत,” असे मत बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी व्यक्त केले आहे.

महागाईत घट

इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी के पंत यांनीही आरबीआयकडून पॉलिसी रेट २५ बेसिस पॉइंट्सने वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “सध्याचे धोरण मजबूत करण्याच्या चक्रातील ही शेवटची दरवाढ असण्याची शक्यता आहे,” असे सांगून ते पुढे म्हणाले की, मागील रेपो रेट वाढ तसेच जागतिक पातळीवर वस्तूंच्या किमतीत झालेली घट यामुळे महागाई दर कमी होत आहे.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ सुवोदीप रक्षित यांनीही RBI रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button