राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; धारावीत वंचित आघाडीची मागणी | पुढारी

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; धारावीत वंचित आघाडीची मागणी

धारावी : पुढारी वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील वादग्रस्त विधानाची वंचित बहुजन मुस्लिम आघाडीने गंभीर दखल घेतली आहे. राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी मंगळवारी पक्षाच्या शिष्टमंडळाने केली. याबाबतचे निवेदन धारावी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर यांना दिले आहे.

गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून माहीम समुद्रात ६५० वर्षांपासून असलेल्या एका जागेवर आक्षेप घेत गेल्या दोन वर्षांपासून दर्ग्याचे काम सुरु आहे, अशी खोटी माहिती पसरवली. शिवाय ३० दिवसात तो दर्गा पाडला नाही तर त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभारू असे, वादग्रस्त विधान करून हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी सदर ऐतिहासिक बैठकीच्या गुरुस्थानाबाबत अनधिकृत बांधकाम असा केलेला उल्लेख पूर्णतः चुकीचा असून दोन समाजात दंगे पसरविण्याच्या उद्देशाने केलेला आहे. सदर पवित्र जागा वक्फ बोर्ड यांच्या नावे औरंगाबाद येथे नोंद केलेली आहे. सदर स्थळाचा अभ्यास न करता जाणीवपूर्वक केलेले हे विधान आहे. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असून दंगा पसरवण्याच्या उद्देशाने केलेले विधान असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून राज ठाकरेंविरुद्ध योग्य तो गुन्हा नोंदवून कार्यवाही करावी, अशा आशयाचे निवेदन पोलिसांना दिले आहे.

हेही वाचा : 

Back to top button