मुंबई: दादरमध्ये शॉटसर्किटमुळे आग, गादीचे दुकान जळून खाक

धारावी: पुढारी वृत्तसेवा : दादर (पूर्व) एस. एस. वाघ मार्गावरील गुरुद्वारा इमारतीमधील सत्यम फोम हाऊसला मंगळवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखत संपूर्ण इमारतीचा वीज पुरवठा खंडित करून आगीवर अवघ्या काही तासातच नियंत्रण मिळविले.
सत्यम फोम हाऊसचे मालक राजूभाई नेहमीप्रमाणे रात्री साडे दहाच्या सुमारास आपले दुकान बंद करून घरी गेले. तेव्हा अचानक रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांच्या दुकानातून धूर येऊ लागला. धुराचे लोट वरच्या मजल्यावरील घरात पसरू लागताच इमारतीत एकच खळबळ माजली. इमारतीमधील रहिवाशांनी तत्काळ घराची दारे खिडक्या बंद करून इमारतीबाहेर धाव घेत दुकान मालक, अग्निशमन दल व स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली. तोपर्यंत बंद दुकानातील रजाई, गाद्या, उश्या, चादरी, कपड्यांचे रोल, फोम, मॅटने पेट घेतल्याने आग वेगाने पसरण्याची शक्यता बळावल्याने रहिवाशांचा थरकाप उडाला.
दरम्यान, रस्त्यावर बघ्यांची एकच गर्दी उसळली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस व अग्निशमन दलाने सर्वप्रथम इमारतीचा वीज पुरवठा खंडित करून आग बाजूच्या दुकानात तसेच वरच्या मजल्यापर्यंत पसरण्यापासून रोखली. दरम्यान, दुकानाचे शटर उघडताच गाद्या, उश्या, फोम आणि कपड्यांच्या रोलने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. आगीचे रौद्ररूप पाहून अग्निशमन दलाने तत्काळ पाण्याचा जोरदार मारा सुरु केला. आणि अवघ्या काही तासांतच आग आटोक्यात आणली. तोपर्यंत दुकानातील संपूर्ण साहित्य फर्निचरसह आगीच्या भक्षस्थानी पडले होते.
हेही वाचा
- मुंबई-पुणे महामार्गावरील टोल दरात वाढ
- IPL 2023 : मुंबईच्या ताफ्यात मोठा बदल; बुमराहऐवजी अर्जुन तेंडूलकरला संधी?
- मुंबईवर क्षयरोगाचे संकट; कस्तुरबा रुग्णालयात होणार जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी