मुंबईवर क्षयरोगाचे संकट; कस्तुरबा रुग्णालयात होणार जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी | पुढारी

मुंबईवर क्षयरोगाचे संकट; कस्तुरबा रुग्णालयात होणार जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत क्षयरोगाचा (टीबी) संसर्ग वाढताना दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात ५६ हजार ११२ टीबी रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे टीबी रुग्णामध्ये नेमक्या कोणत्या व्हेरिएंटची लागण झाली हे शोधण्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्यात येणार आहेत.

मुंबई २०२० व २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. २०२० मध्ये ३७ हजार ९४३ रुग्णांची नोंद झाली होती. तर २०२१ मध्ये सुमारे ५० हजार ५६४ रुग्णांची नोंद झाली. महिलांची संख्या सर्वाधिक आहे. २०२२ मध्ये ५६ हजार ११२ रुग्णांची नोंद झाली. यात पुरुषांची संख्या २७ हजार ४५४ तर महिलांची संख्या २८ हजार ६२९ इतकी आहे. पालिकेने केलेल्या एका चाचणीत टीबी विषाणूच्या व्हेरिएंटमुळे टीबीचा प्रसार वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टीबी रुग्णांमध्ये नेमक्या कोणत्या व्हेरिएंटची लागण झाली, याचा शोध घेण्यासाठी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्यात येणार आहेत. या चाचणीत नेमका कोणता व्हेरिएंट हे कळल्यानंतर त्या रुग्णावर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे. एवढेच नाही तर रुग्ण लवकर टीबीमुक्त होऊ शकतो, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

२०२५ पर्यंत मुंबई टीबी मुक्त

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबई २०३० पर्यंत | टीबीमुक्त करयची आहे; मात्र पालिकेने २०२५ पर्यंत मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांचे सर्वेक्षण करून टीबीबाधित रुग्ण शोधून त्यांना टीबीमुक्त होईपर्यंत मोफत उपचार देण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Back to top button