माहीम समुद्र किनाऱ्यावरील १७ कुटुंब बेघर : महापालिकेची कारवाई
धारावी: पुढारी वृत्तसेवा : माहीम येथील मखदूम शाह बाबा दर्ग्यामागील समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या १७ कुटुंबावर रमजानच्या पवित्र महिन्यात बेघर होऊन अश्रू ढाळण्याची वेळ ओढावली. या रखरखत्या उन्हात कुटुंबातील चिमुरडी व वृद्धांना घेऊन जायचे कुठे ? त्यातच आपली सूद घेण्यास कोणताही राजकीय नेता न फिरकल्याने अश्रू अनावर झालेल्या महिलांनी आपल्या कडील सबळ पुरावे दाखवत आमचे पुनर्वसन कुठेही करा, अशी मागणी केली.
१९७८ साली पोट भरण्यासाठी मुंबईत आलेल्या १७ कुटुंबीयांनी माहीम मखदूम शाह बाबा दर्गा आणि हजरत ख्वाजा खिजर गुरुस्थान यांच्या मध्यभागी असलेल्या समुद्र किनाऱ्या लगतच्या भिंतींना खेटून आपला संसार थाटला. त्यानंतर तब्बल २५ वर्षानंतर त्यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत महापालिकेने त्यांना नोटीस बजावली. त्यावेळी रहिवाशांनी आपल्या जवळील रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, मुलांचा जन्म दाखला तसेच आधारकार्ड यासारखे अधिकृत सबळ पुरावे सादर केल्याने कारवाई टळली.
दरम्यान, गेल्या पाच दिवसापूर्वी मोठ्या फौजफाट्यासह महापालिकेने हजरत ख्वाजा खिजर यांच्या गुरुस्थानावर कारवाई केली. अधिकाऱ्यांनी येथील रहिवाशांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांना घराबाहेर काढण्यास सुरुवात केली. तेव्हा रहिवाशांनी पुरावे दाखवत आम्हाला घरातील सामान काढण्यासाठी वेळ द्या, अशी मागणी केली. मात्र प्रशासनाने अतिरिक्त वेळ न देता जेसीबीच्या साहाय्याने येथील १७ घरे भुईसपाट केली. त्यात त्यांचा भरलेला संसार क्षणात उद्ध्वस्त झाला.
हेही वाचा

