गुंतवणूक : लार्ज-मिड कॅप फंड म्हणजे काय? | पुढारी

गुंतवणूक : लार्ज-मिड कॅप फंड म्हणजे काय?

लार्ज कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप किंवा स्मॉल कॅप इक्विटी फंड हे फंड कंपनीच्या आकारानुसार निश्चित केले जातात. उदाहरणार्थ, लार्ज कॅप फंडमध्ये सर्वाधिक भांडवल असलेल्या आघाडीच्या शंभर कंपन्यांचा समावेश असतो. या कंपनीच्या शेअरमध्ये फंडामधील एकूण 80 टक्के रक्कम गुंतवली जाते. हेच धोरण मिड कॅप फंडाला लागू पडते. त्यात किमान 65 टक्के गुंतवणूक केली जाते.

लार्ज-मिड कॅप फंड

बाजार नियामक संस्था म्हणजेच ‘सेबी’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार (गाईडलाईन्स) ‘लार्ज आणि मिड कॅप फंड्स’च्या फंड मॅनेजरला लार्ज कॅपमध्ये 35 टक्के अमिड कॅप 35 टक्के गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. उर्वरित 30 टक्के मिड कॅप, लार्ज कॅप किंवा स्मॉल कॅप यापैकी कोणत्याही फंडमध्ये गरजेनुसार गुंतवणूक करता येते. या विभागणीच्या पद्धतीमुळे हे म्युच्युअल फंड स्थैर्याबरोबरच परतावाही चांगला देतात. सेबीच्या नियमानुसार बाजार भांडवलाच्या हिशोबानुसार आघाडीच्या शंभर कंपन्या लार्ज कॅपच्या श्रेणीत येतात. तसेच देशातील आघाडीच्या 150 कंपन्या मिड कॅप श्रेणीत येतात.

या फंडमधील मालमत्ता किती?

गेल्या वर्षी लार्ज आणि मिड कॅप फंड्सचे असेट अंडर मॅनेजमेंंट (एयूएम) हे तब्बल 1 लाख कोटींच्या आसपास होते. सध्या 31 जानेवारी 2023 पर्यंत ‘एएमएफआय’(असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड) च्या आकडेवारीनुसार ‘लार्ज आणि मिड कॅप’ योजनेत 76.75 लाख फोलिओ असून, त्यांची एकूण मालमत्ता 1.27 लाख कोटी एवढी आहे. या फंड्सचा सर्वाधिक फायदा म्हणजे गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओमध्ये ग्रोथ आणि स्टॅबिलिटी ही एकाचवेळी मिळते.

या फंड्समध्ये कोणी गुंतवणूक करावी?

लार्ज आणि मिड कॅप फंडामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. यासाठी किमान पाच वर्षे गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. आपल्या गुंतवणुकीतील 35 टक्के फंड मिड कॅपमध्ये गुंतवला जातो. मिड कॅपमध्ये परतावा चांगला मिळतो; परंतु तेथे जोखीमही अधिक असते, पण शुद्ध मिड कॅप फंड्सच्या तुलनेत लार्ज आणि मिड कॅप फंडामध्ये जोखीम कमी राहते. कारण शुद्ध मिडकॅप फंड्समध्ये 65 टक्के रक्कम ही मिडकॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली जाते. लार्ज आणि मिड कॅप फंड्समधील गुंतवणुकीला बाजारातील मूडनुसार बदल केला जातो.

या फंडमधील गुंतवण्याचे फायदे

लार्ज आणि मिड कॅप फंड हे गुंतवणुकीचे स्थैर्य, सुरक्षितता आणि परतावा या तिन्ही निकषांवर सरस ठरतात. सध्याच्या काळात 25 पेक्षा अधिक म्युच्युअल फंड योजना या श्रेणीमध्ये येतात. लार्ज आणि मिड कॅप फंड्समध्ये फंड मॅनेजरला उर्वरित 30 टक्के गुंतवणूक मिड कॅप, लार्ज कॅप किंवा स्मॉल कॅपपैकी कोठे गुंतवणूक करावी, याचा अधिकार असतो. आपण अ‍ॅग्रेसिव्ह गुंतवणूकदार असाल तरच या फंडाची निवड करायला हवी. जोखीम नको असेल तर या फंड्सपासून दूर राहणे हिताचे ठरते. अशा गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप फंडची निवड करायला हरकत नाही. बाजाराची वाटचाल जेव्हा घसरणीकडे सुरू होते तेव्हा हे फंड मॅनेजर 65 टक्के फंड लार्ज कॅपकडे स्थानांतरित करतात. परिणामी, आपल्या गुंतवणुकीला या घसरणीपासून सुरक्षित ठेवले जाते. उर्वरित 35 टक्के गुंतवणूक मिड कॅपमध्ये ठेवली जाते. यासाठी नियम निश्चित केलेले आहेत. त्याचवेळी, जेव्हा बाजारात तेजी येते तेव्हा फंड मॅनेजर हा गुंतवणूकदारांचा फंड मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये वळवतो. जेणेकरून गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळतो.
बहुतांश लार्ज आणि मिड कॅप फंडमधील 50 ते 60 टक्के गुंतवणूक लार्ज कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये केली जाते आणि 35 ते 40 टक्के गुंतवणूक ही मिड कॅप समभागांमध्ये केली जाते.

Back to top button