मुंबई: वडाळ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार  | पुढारी

मुंबई: वडाळ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार 

धारावी : पुढारी वृत्तसेवा: वडाळा चेंबूर मार्ग जीएसटी भवनच्या समोरील रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. चिन्मय सुनील गुरव (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर बेदरकारपणे वाहन चालवत अपघात करून पळून गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा टी टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळा चेंबूर रोडवरून चिन्मय गुरव आपल्या दुचाकीवरून (एमएच ०९ सी एफ ९०९०) चेंबूरच्या दिशेने जात होता. दरम्यान त्याच्या मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात दुचाकी बाजूला फेकली जाऊन चिन्मय त्या अज्ञात वाहनाच्या चाकाखाली आला. आणि भरधाव वाहन पोटावरून गेल्याने त्याचा  जागीच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सीमा खंडागळे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button