मुंबई: कुर्ल्यात नववर्षानिमित्त शोभायात्रा; लघुपटाद्वारे जनजागृती | पुढारी

मुंबई: कुर्ल्यात नववर्षानिमित्त शोभायात्रा; लघुपटाद्वारे जनजागृती

धारावी: पुढारी वृत्तसेवा : मागील ७५ वर्षात भारताने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. अन्नधान्य, दुग्ध उत्पादन बाबतीत स्वयंपूर्ण, संरक्षण, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आयटी क्षेत्रासह अवकाशातही गरुडझेप घेतली आहे. जगात सर्वात वेगाने विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. यावर प्रकाश टाकणारा लघुपट, अनेक चित्ररथ, देखाव्यासह पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या कुर्लेकरांनी गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शोभायात्रेत घोड्यावर आरूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज, पारंपरिक वेशात दुचाकी चालविणाऱ्या महिला आकर्षणाचा केंद्र बिंदू होता. भारत सिनेमा चौकात साकारण्यात आलेली यशोस्तुते भरारी स्वतंत्र भारताची सजावट साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. सालाबादप्रमाणे यंदाही उत्सव हिंदुत्वाचा, उत्सव कुर्ल्याचा या घोषवाक्याने कुर्ल्यात नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा कुर्ला (प.) यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

शोभायात्रेत खासदार पूनम महाजन सहभागी झाली होत्या. स्वागत यात्रेत कुर्ला पश्चिम येथील सर्वेश्वर मंदिर, जयभवानी चौक, गौरीशंकर मंदिर, शिक्षक नगर येथील चार शोभायात्रा सामील झाल्या होत्या. कुर्ल्यातील सर्व रस्ते भगव्या पताकांनी सजले होते शोभायात्रेला सकाळपासूनच सुरुवात झाली. चौकाचौकात शोभायात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. मावळ्यांसह सामील झालेले छत्रपती शिवाजी महाराज, मानवी मनोरे, शिवकालीन शस्त्रकाला, पारंपारिक वेशभुषेतील महिला पुरुष, सामाजिक, सुरक्षा विषयावर सजलेला चित्ररथ, गुढी हातात घेऊन शोभायात्रेत सामील झालेल्या महिला या शोभायात्रेचे खास आर्कषण ठरल्या.

हातात भगवे झेंडे घेऊन ढोल ताश्याच्या गजरात नाचत गाजत कुर्ला विभागातील मंडळांनी एकत्र येऊन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढली होती. चार शोभायात्रा कुर्ला स्थानक येथील भारत सिनेमा चौकात एकत्र आल्या. यावेळी कुर्ला पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भारत सिनेमाजवळ नेहमीप्रमाणे सर्व वाद्य बंद करून शोभायात्रेची सांगतेसाठी हजारोचा जमाव जागृती विनायक मंदिराकडे वळला. जागृती विनायक मंदिरात महाआरती करून शोभायात्रेची सांगता करण्यात आली.

हेही वाचा 

Back to top button