Amruta Fadnavis: अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी उल्हासनगरमध्ये छापे; डिझाईनर अनिक्षा ताब्यात | पुढारी

Amruta Fadnavis: अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी उल्हासनगरमध्ये छापे; डिझाईनर अनिक्षा ताब्यात

पुढारी ऑनलाईन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची फसवणूक करुन धमकावल्याप्रकरणी आज
( दि. १६) पोलिसांनी उल्हासनगरमध्ये छापे टाकले. या प्रकरणी उल्हासनगर येथून डिझाईनर अनिक्षा हिला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनिक्षा हिच्या वडिलावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरमधून ताब्यात घेतलेल्या आरोपी अनिक्षा हिची अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना धमकी देत १ कोटी रूपयांची लाच ऑफर केल्याप्रकरणी डिझाईनर अनिक्षा आणि तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात मलबार हिल पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात कलम १२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ अंतर्गत कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)  यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर २०२१ साली पहिल्यांदा भेट झाली होती. आरोपी अनिक्षाने अमृता यांना सांगितले होते की, ती कपडे आणि दागिन्यांची डिझायनर आहे. मी डिझाईन केलेले कपडे आणि दागिने अमृता यांनी सार्वजनिक कार्यक्रमात घालावे, अशी विनंती आरोपी अनिक्षा हिने केली होती. यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षाशी भेट झाली असल्याचेही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात अनिक्षा ही अमृता यांना भेटली होती. दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर अनिक्षाला मी कारमध्ये बसवले तेव्हा अनिक्षाने तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत असतात. त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. अनिक्षाने अशी माहिती देताच अनिक्षाला कारमधून खाली उतरवल्याचे अमृता फडणवीस यांनी तक्रारीत म्हटले आहे.

वडिलांवर एका प्रकरणी आरोप करण्यात आले असल्याचे अनिक्षा हिने अमृता फडणवीस यांना सांगितले होते. याप्रकरणात त्यांना बाहेर काढण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटी रूपये देण्याची तयारी असल्याचेही तिने म्‍हटले होते, याप्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्याची विनंती फोनद्वारे केली होती. यानंतर अमृता यांनी फोन कट करत तिला ब्लॉक केले. तिने पुन्हा अनोळखी नंबरवरून अमृता फडणवीस यांना व्हॉट्स ॲपवरून व्हिडीओ क्लीप, व्हॉईस नोटस पाठवले होते. त्यानंतर हा नंबर आरोपी अनिक्षा हिच्या वडिलांचा असल्याची माहिती अमृता यांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्‍याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा:

 

Back to top button