Maharashtra : अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाला भेटणार | पुढारी

Maharashtra : अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाला भेटणार

पुढारी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान माकपकडून काढण्यात आलेला मोर्चा मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान सरकारकडून या मोर्चाला कोणता प्रतिसाद देण्यात आला नव्हता. पण सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे या आंदोलनातील प्रतिनिधींना आज (दि.१६) मंत्रालयात भेटण्याची शक्यता आहे.

यापूर्वी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मंत्री दादा भुसे व अतुल सावे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाची शहापूर तहसील कार्यालयात बुधवारी (दि.१५) संध्याकाळी भेट घेतली होती. पण ही बैठक आणि चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज दुपारी किसान मोर्चातील प्रतिनिधींना पुन्हा भेटणार आहेत. या बैठकीत तोडगा निघाला नाही तर, हा लाँग मार्च विधानभवनावर धडकणार असल्याचे मोर्चातील प्रतिनिधी माजी आमदार जे. पी. गावित यांनी सांगितले आहे.

अखेर मंत्रालयातच होणार भेट

दरम्यान, किसान सभेच्या मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी मोर्चाच्या ठिकाणी यावे, अशी भूमिका गावित यांनी घेतली होती. त्यामुळे सरकज्ञारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री भुसे आणि सावे यांनी शेतकर्‍यांसोबत चर्चा केली, मात्र ती निष्फळ ठरली. त्यामुळे आज दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रालयातच या शिष्टमंडळाला भेटण्याची शक्यता आहे.

या मागण्यांसाठी किसान सभेचा लाँग मार्च

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करा, कांद्याला भाव द्या, जुनी पेन्शन लागू करा, आदिवासींच्या जमिनी नावावर करा, शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या, या मागण्यांसाठी ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी पायी लाँग मार्च नाशिक येथून मुंबईच्या दिशेने काढण्यात येत आहे.

हेही वाचा:

Back to top button