सरकार टिकवण्यासाठी सर्व काही अस्थिर करण्याचा प्रयत्न : उद्धव ठाकरे | पुढारी

सरकार टिकवण्यासाठी सर्व काही अस्थिर करण्याचा प्रयत्न : उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सरकार टिकवण्यासाठी सर्व काही अस्थिर करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. भाजपमध्ये सामील व्हा किंवा जेलमध्ये जा, असा काळ आला आहे. त्यामुळे ही विरोधकांसाठी परीक्षेची वेळ आहे. महाविकास आघाडीने एकजूट राखून त्याला चोख प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बुधवारी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक झाली. यावेळी तिन्ही पक्षाच्या आमदारांसह प्रमुख नेते उपस्थित होते. 2 एप्रिल ते 11 जूनदरम्यान ‘मविआ’च्या राज्यभरात सात संयुक्त सभा होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे पहिली सभा होणार आहे. त्यानंतर नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती येथे सभा होणार आहेत.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले ते 75 वर्षांनंतर मोदी येतील यासाठी दिले नाही. सध्या विरोधी पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये सामील व्हा; अन्यथा तुरुंंगात जा, असे भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, येथे हे खपवून घेतले जात नाही, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. या दबावतंत्राविरोधात एकीने लढा देण्यासाठी तयार राहा, असेही ठाकरे म्हणाले. या सभा राज्यात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी होणार असून, सध्या 2024 नंतर निवडणुका होतील की नाही, अशी परिस्थिती असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.

पावसातल्या सभा आमच्यासाठी फायद्याच्याच : अजित पवार

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सर्व सभा मोठ्या व्हायला हव्यात. ऊन, वारा, पाऊस, गारपीट झाली तरी या सभा रद्द होणार नाहीत. पावसातील सभा आपल्यासाठी फायद्याच्याच आहेत. त्यामुळे आपापल्या विभागातील सर्व तालुक्यांतून सभेसाठी ‘मविआ’चे समर्थक यायला हवेत त्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही यावेळी भूमिका मांडली. महाविकास आघाडीतला हा एकोपा कायम राहिला, तर आगामी निवडणुकीत आघाडीला किमान 180 जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

Back to top button