मुख्यमंत्र्यांवरही हक्कभंग आणू; विरोधकांचे जशास तसे उत्तर | पुढारी

मुख्यमंत्र्यांवरही हक्कभंग आणू; विरोधकांचे जशास तसे उत्तर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे नेते, खा. संजय राऊत यांच्याविरोधात सत्ताधारी आमदारांनी बुधवारी जोरदार घोषणाबाजी केली. राऊतांच्या अटकेची मागणी करत सत्ताधाऱ्यांनीच विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. त्यामुळे अडचणीत आलेल्या विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य केले. विरोधकांना देशद्रोही संबोधून मुख्यमंत्र्यांनीही विधिमंडळाचा अवमान केला आहे. त्यामुळे न्याय सर्वांना समान हवा, आता आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणू तो तुम्हाला स्वीकारावा लागेल, असा इशारा विरोधकांनी दिला.

हक्कभंग : विधिमंडळ हे चोरमंडळ

ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी विधिमंडळ हे चोरमंडळ झाल्याचे विधान करून अधिवेशन सुरू असताना सत्ताधाऱ्यांच्या हातात आयते कोलित दिले. राऊत यांच्या विधानाची उपसभापतींनी दखल घेत हक्कभंग सादर करावा. तसेच राऊत यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. आपल्या मागणीसाठी भाजपा आमदारांनी केलेल्या मागणीमुळे विधान परिषदेचे कामकाज आधी दहा मिनिटांसाठी आणि नंतर पंधरा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज भरले तेंव्हाही सत्ताधारी आमदार आपल्या मागणीवर ठाम होते. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल अभिनंदनाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सत्ताधयानी अचानक संजय राऊतांवरून गदारोळ सुरू केल्याने विरोधकांची कोंडी झाली.

संजय राऊत यांच्या विधानाचे थेट समर्थन अशक्य असल्याने त्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र, नेमके विधान काय होते याची पडताळणी आवश्यक असल्याची भूमिका विरोधकांनी घेतली. शिवाय, सतत तिसऱ्या दिवशी सभागृहाचेकामकाज वाया घालविणे योग्य नसल्याची भावना विरोधकांनी व्यक्त केली. अखेर, संजय राऊतांवर सत्ताधारी हक्कभंग आणत असतील तर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हक्कभंग आणू असा इशारा विरोधकांनी दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. तेव्हा देशद्रोह्यांसोबत चहा घेणे टळल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.विरोधकांना देशद्रोही म्हणणेसुद्धा विधिमंडळाचा अवमान आहे. न्याय सर्वांना समान असतो. त्यामुळे आम्हीसुद्धा मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणू, तेव्हा तो तुम्हाला स्वीकारावा लागेल, असा इशारा ठाकरे गटाचे आ. अनिल परब यांनी दिला.

एका अर्थाने देशद्रोहच- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

• शिंदे-फडणवीस सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याने त्यांच्या चहापानाला उपस्थित राहणे महाराष्ट्रद्रोह ठरला असता, असे सांगत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. त्यावर, दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्याचा महाविकास आघाडी सरकारच्या काळात राजीनामा घेण्यात आला नाही. हा एका अर्थाने देशद्रोहच आहे. त्यामुळे विरोधक चहापानाला न आल्याने माझा देशद्रोह टळला, असा पलटवार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता.

हेही वाचा

Back to top button