Prakash Ambedkar : …तर उद्धव ठाकरेंना नक्की न्याय मिळेल: प्रकाश आंबेडकर | पुढारी

Prakash Ambedkar : ...तर उद्धव ठाकरेंना नक्की न्याय मिळेल: प्रकाश आंबेडकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या संदर्भात दिलेल्या निकालाच्या विरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. मुळात निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का ? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे, राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणे, हे निवडणूक आयोगाचे काम नाही. हाच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले, तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल, असे प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांनी दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयावर आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांनी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, दोन्ही गटांच्या विस्तृत तसेच लेखी युक्तिवादानंतर ७८ पानी आदेशातून आयोगाने हा निर्णय सुनावला आहे. शिवसेनेवर त्यामुळे ठाकरे गटाचे दशकांपासून असलेले वर्चस्व संपुष्टात आले आहे. जूनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांच्याबरोबर सुरुवातीला १६, तर नंतर ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात विरोधात बंड केले होते. या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाने खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडूनही असाच दावा करण्यात आला होता.

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन घोषणा करावी की लोकशाही संपली आहे. देशांत बेबंदशाहीला सुरुवात झाली आहे. पक्ष कोणाचा बरोबर आहे आणि कोणाच्या बरोबर आहे, हे निवडूण आलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येवर ठरवले. तर कोणताही धनाढ्य माणूस पक्ष विकत घेईल, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

चोराला राजमान्यता देणे काही जणांना भूषणावह वाटत असेल. मात्र, चोर हा चोरच असतो. ज्यापद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना नाव त्यांनी मिंधे गटाला दिले. त्यावरुन मला वाटतय की, महिन्याभरात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होतील, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कागदपत्रे देण्याचा खटाटोप कशाला करायला लावला, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला आहे. शिवाय पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप ठाकरेंनी यावेळी बोलताना केला.

हेही वाचा 

Back to top button