बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला : दीपक केसरकर | पुढारी

बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला : दीपक केसरकर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचा विचार होता. बाळासाहेबांच्या या विचाराचा आज खर्‍या अर्थाने विजय झाला. आमची बाजू सत्तेची होती म्हणून बाळासाहेबांची शिवसेना कायम राहिली, अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी रात्री आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनाही मूळ विचारधारेसोबत जायचे होते; मात्र त्यांच्यावर कोणाचा प्रभाव पडला माहीत नाही, असे सांगत आजही ते कोणाच्यातरी दबावाखालीच बोलत आहेत, असेही केसरकर यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाने लोकशाहीचे धिंडवडे निघाले म्हणणार्‍यांना नैतिक बळ आहे का, असा सवाल करेल केसरकर म्हणाले, शिवसेनेच्या घटनेमध्ये 2018 मध्ये बदल केला आणि निवडीचे सर्वाधिकार स्वतःकडे घेतले. ही माहिती आयोगाला देणे बंधनकारक होते. ती दिली नाही असे अनेक मुद्दे, संदर्भ घेत, सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत जे जे निर्णय घेतले तसेच आयोगाने कसे काम करावे याबाबत घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे या सर्वांचा विचार करून आयोगाने निर्णय दिला. वास्तविक आयोगानेच लोकशाहीची बूज राखली असेही केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा आम्ही कधीच राजीनामा मागितला नाही उलट स्वतःहून त्यांनी तो दिला. आम्ही, तुम्हीच मुख्यमंत्री राहा. फक्त आपल्या विचारधारेसोबत जाऊया, असे सातत्याने सांगत होतो. मात्र ज्या काँग्रेस- राष्ट्रवादीने आतापर्यंत पाच वेळा शिवसेना फोडली, त्यांच्याशीच हात मिळवणी केली. ही बाब खर्‍या शिवसैनिकांना सहन झाली नाही. शिवसेनेच्या विचारांसाठी आम्ही आमची आमदारकी पणाला लावली असे सांगत जी व्यक्ती कालपर्यंत दोन नंबरचा नेता होती. ती चोर, नामर्द कसे असू शकतात. बोलताना किमान आपण काय बोलतो याचे भान ठेवले पाहिजे, असे सांगत आदित्य ठाकरे त्यांना राजकारणातले काय कळते, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. वडील मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री असे राज्याच्या राजकारणात जनतेने प्रथमच पाहिले आणि त्यातून चुकीचा संदेश गेला. जे पाच वेळेला आमदार झाले. त्यांना मंत्री करावे, असे उद्धव ठाकरे यांना कधी वाटले नाही.

कोल्हापूर दौर्‍यावर असताना शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याची माहिती मिळाली. यानंतर खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी पेढा भरवून केसरकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिनंदन करत आनंद साजरा केला. यानंतर केसरकर यांनी रात्री दहा वाजता अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Back to top button