हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय: धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया | पुढारी

हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय: धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाकडून हा निर्णय आज (दि.१७) जाहीर करण्यात आला. यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा सत्याचा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. लोकशाहीचा हा विजय असून बहुमताचा विजय झाल्याचे सिद्ध झाले आहे. याबद्दल मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. यापुढे बाळासाहेबांच्या विचारांने राज्य कारभार करू, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

लोकशाहीचा विजय आहे. बहुमताचा विजय आहे. दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आणि शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे, असेही शिंदे यांनी म्हटले.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच शिवाय ‘शिवसेना’ हे नाव देखील शिंदे गटाला देण्यात आले आहे.

शिवसेनेची आत्ताची घटना ही लोकशाही विरोधी आहे. पक्षसंघटनेत कंपूगिरी करुन लोकांच्या नियुक्त्या केल्या जातात. नियुक्त्यांसाठी कोणत्याही निवडणूका घेतल्या जात नाहीत. अशा प्रकारची रचना असलेल्या पक्षात इतरांना विश्वास मिळू शकत नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

राजकीय पक्षांची पदाधिकाऱ्यांच्या निवडणूकांना पारदर्शी पद्धतीने वाव देणारी असली पाहिजे आणि पक्षांतर्गत वादांची मोकळ्या पद्धतीने सोडवणूक झाली पाहिजे. घटनेतील अशा तरतुदी सहजासहजी बदल करता येऊ नयेत आणि जर असा बदल करायचा असेल तर पक्षसंघटनेतून मोठा पाठींबा असणे आवश्यक आहे.

हेही वाचा 

Back to top button