पुढारी ऑनलाईन : एक वर्षांच्या मुलीला तिच्या आईकडून विकत घेतल्याचा आरोप असलेल्या महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. नवरा तुरुंगात असल्याने आर्थिक गरजेसाठी एका आईने पोटच्या मुलीची विक्री केली होती. ही घटना साताऱ्यातील आहे. (Bail to woman accused of buying girl child)
गेल्या वर्षी अश्विनी बाबर या महिलेला साताऱ्यात अटक झाली होती. अश्विनी बाबर आणि तिच्या नवऱ्यावर एका लहान मुलीला विकत घेतल्याचा आरोप आहे. या मुलीच्या आईने बाबर यांच्याकडून घेतलेली रक्कम परत केली आणि मुलीचा हक्क मागितला, पण बाबर दाम्पत्याने मुलीचा ताबा देण्यास नकार दिला. त्यानंतर या महिलेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांत तक्रार नोंद झाल्यानंतर बाबर दाम्पत्याने मुलीला तिच्या आईकडे सोपवले.
या प्रकरणात अश्विनी बाबर हिने जामिनासाठी अर्ज केला होता. ८ फेब्रुवारीला उच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजुर केला.
न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांनी निकालात म्हटले आहे की, "बाबर हिला तुरुंगात ठेवण्याची काही गरज नाही, कारण या खटल्यात लगेच सुनावणी सुरू होणार नाही. बाबर हिला दोन लहान मुले आहेत, हेसुद्धा विचारात घेतले पाहिजे."
मोडक म्हणाले, "२१व्या शतकात मुलीला वस्तू मानून आर्थिक फायद्यासाठी माध्यम म्हणून वापरले जाते. नैतिकता आणि मानवी हक्कांच्या तत्त्वानुसार हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. विक्री शब्द वापरतानाही अत्यंत वेदना होत आहेत. या प्रकारात तर या मुलीच्या आईने ही विक्री केलेली आहे."
बाबर हिला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. बाबर दाम्पत्याकडे सावकारकीचा परवाना नाही, तरीहे कर्ज देत होते. "त्यांनी मानवतेच्या विरोधात गुन्हा केला आहे. त्यांनी या मुलीचा ताबा घेतला शिवाय आईने रक्कम परत दिल्यानंतर त्यांनी मुलीला आईकडे परत देण्यास नकारही दिला," असे मोडक यांनी म्हटले आहे. अश्विनी बाबर हिच्या नवऱ्याला या प्रकरणात यापूर्वीच जामीन मंजुर झाला आहे.
हेही वाचा