

Stock Market Closing : किरकोळ महागाई दर नोव्हेंबरपासून उच्च पातळीवर पोहोचला असूनही जागतिक सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत आज मंगळवारी (दि.१४) शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने ( Nifty) तेजीत सुरुवात केली होती. आजच्या व्यवहारात फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढला होता. त्यानंतर दुपारच्या सत्रात सेन्सेक्स सेन्सेक्स ६०० अंकांहून अधिक वाढून ६१ हजारांवर पोहोचला. तर निफ्टीची १८ हजारांच्या दिशेने वाटचाल केली होती. त्यानंतर बाजार बंद होईपर्यंत ही तेजी कायम राहिली. सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढून ६१,०३२ वर बंद झाला. तर निफ्टी १५८ अंकांच्या वाढीसह १७,९२९ वर स्थिरावला.
आजच्या व्यवहारात निफ्टी आयटी १.०३ टक्के वाढला. तर निफ्टी मेटल ०.३२ टक्के वधारला. निफ्टी ऑटो आणि निफ्टी फार्मामध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्सवर इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक हे टॉप गेनर्स होते. हे शेअर्स ०.५ ते १ टक्क्यापर्यंत वाढले. विप्रो, टेक महिंद्रा, एम अँड एम, रिलायन्स आणि एचडीएफसी बँक हेदेखील आज तेजीत राहिले. दरम्यान, टायटन, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, सन फार्मा आणि कोटक बँक हे शेअर्समध्ये घसरण झाली.
एचसीएल टेक्नॉलॉजीस (२.२६ टक्के), आयटीसी (२.१५ टक्के), टेक महिंद्रा (२.०४ टक्के), इन्फोसिस (१.६६ टक्के), बजाज फायनान्स (१.४७ टक्के), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.५६ टक्के) या शेअर्संनी आघाडी घेतली. तसेच गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (१.०३ टक्के), नेस्ले इंडिया (०.७८ टक्के), हिंदुस्तान युनिलिव्हर (०.७८ टक्के), मॅरिको (०.६१ टक्के), ब्रिटानिया (०.५९ टक्के), टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (०.२० टक्के) आदी FMCG शेअर्स आजच्या व्यवहारात वधारले होते.
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण कायम राहिली आहे. आजदेखील अदानींचे शेअर्स ५ टक्क्यांपर्यंत घसरले. अदानींच्या १० शेअर्सपैकी केवळ अदानी पोर्टस्च्या शेअरमध्ये किरकोळ वाढ दिसून आली. तर इतर ९ स्टॉक्स लाल रंगात न्हावून निघाले. यामुळे अदानी समूहाच्या बाजार भांडवलात मोठा घट होऊन ३० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, विल्मर, एनडीटीव्ही आणि अदानी ग्रीन एनर्जी या शेअर्संना ५ टक्के लोअर सर्किट लागले.
जागतिक स्तरावरील बाजारांबाबत सांगायचे झाल्यास अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक सोमवारी वधारुन बंद झाले. एस अँड पी ५०० निर्देशांक १.१५ टक्क्याने तर नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक १.४९ टक्क्याने वाढला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज १.११ टक्क्याने वाढून बंद झाला. दरम्यान, आशियातील बाजारात आज संमिश्र वातावरण दिसून आले. निक्केई २२५ निर्देशांक ०.६४ टक्के म्हणजेच १७५ अंकांनी वाढून २७,६०२ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक १५ अंकांनी वाढून १,९९३ वर पोहोचला.
अमेरिकन सरकारने स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (एसपीआर) मधून अधिक क्रूड रिलीज केले जाईल असे सांगितल्यानंतर मंगळवारी तेलाच्या किमती घसरल्या. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स ०.७५ टक्के घसरून प्रति बॅरल ८५.९६ डॉलरवर, तर यूएस क्रूड फ्यूचर्स प्रति बॅरल १.१२ टक्के घसरून ७९.२४ डॉलरवर आले आहे. (Stock Market Closing)
हे ही वाचा :