Ramdas Athawale: ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला ‘रिपाइं’चा पाठिंबा : रामदास आठवले | पुढारी

Ramdas Athawale: ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला 'रिपाइं'चा पाठिंबा : रामदास आठवले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळते. मात्र, विधानसभा आणि लोकसभेत ही ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असेल. त्यासाठी रिपाइंच्या नेतृत्वाखाली देशभर एससी, एसटी आणि ओबीसींची एकजूट करणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)  यांनी केली. रिपब्लिकन पक्षातर्फे हैद्राबादमधील रवींद्र भारती हॉलमध्ये ओबीसी गर्जना संमेलन घेण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आठवले बोलत होते.

यावेळी तेलंगणा राज्यातील विविध ओबीसी संघटना तसेच निष्पक्ष असणाऱ्या ओबीसी समन्वय समिती तर्फे आठवले (Ramdas Athawale)  यांचा सत्कार करण्यात आला. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा ओबीसींमधून आलेले लोकप्रिय नेतृत्व लाभले आहे. त्यांच्याकडून ओबीसी समाजाला मोठ्या अपेक्षा असून त्या पूर्ण होतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. यावेळी रिपाइंचे परम केशव नागेश्वराव गौड, ब्रह्मानंद रेड्डी, कोमपल्ली प्रभूदास, गोरखसिंग रोझा आदी उपस्थित होते.

यावेळी रिपाइंचे आंध्रप्रदेश अध्यक्ष ब्रह्मानंद रेड्डी यांनी दांडिया नृत्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. दांडियाच्या तालावर मंत्री रामदास आठवले यांनी हाती दांडिया घेऊन ठेका धरला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती केले आहे. तरी त्यातून काही चमत्कार घडणार नाही. त्यांचा संपूर्ण भारतात पक्ष चालणार नाही. मात्र, संपूर्ण भारतात मोदी यांचे नेतृत्व लोकप्रिय असून आगामी विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये मोदींच्याच नेतृत्वाची जादू चालणार आहे. केसीआर यांच्या हातून तेलंगणाची सत्ता जाणार असल्याचा दावा आठवले यांनी केला.

यावेळी तेलंगणा  टॅक्सी ड्रायव्हर च्या शिष्टमंडळाने ओला उबेर ही सेवा परदेशी असून त्यामुळे ती  रद्द करण्याची मागणी केली.यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले. यावेळी तेलंगणा चे माजी मंत्री इठ्ठल यांनी ओबीसी बाबत आपले विचार मांडून ना.रामदास आठवले यांचे स्वागत केले. तसेच तेलंगणाचे ज्येष्ठ दलित नेते आणि राज्यसभा खासदार कृष्णय्या यांनी ना.रामदास आठवले यांचे भव्य स्वागत केले.

हेही वाचा 

Back to top button