पिंपरी : शिवसेनेच्या अवस्थेस उद्धव हेच जबाबदार: मंत्री रामदास आठवले यांची टीका | पुढारी

पिंपरी : शिवसेनेच्या अवस्थेस उद्धव हेच जबाबदार: मंत्री रामदास आठवले यांची टीका

पिंपरी : भाजपसोबत शिवसेनेने आघाडी केली असती, तर शिवसेनेत बंड झालेच नसते. एकनाथ शिंदे समर्थक 40 आमदार आणि खासदार बाहेर पडून भाजपसोबत नवीन सरकार स्थापन झाले नसते. त्यामुळे सध्या शिवसेनेची अवस्था खिळखिळी झाली असून, या अवस्थेला उद्धव ठाकरे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली.
पिंपरी येथे आरपीआय आठवले गटाच्या वतीने आयोजित राज्य महिला आघाडी मेळाव्यात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री आठवले बोलत होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, राज्यातील उद्योग पूर्वीच्या राज्य सरकारच्या अयोग्य धोरणांमुळे बाहेर गेले. हे उद्योग बाहेर न जाता इथेच राहतील यासाठी शिंदे- फडणवीस सरकार ताकद लावत आहे. राज्यातील महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहेच. तसेच महिलांवर अत्याचार करणार्‍याला फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे.

पुढील मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला एक मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. तसेच राज्य सरकारच्या विविध कमिट्या, महामंडळांवर देखील आरपीआयला जागा द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे केंद्रीय मंत्री आठवले यांनी सांगितले. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 39 जागा देण्याचीही मागणी केली आहे. मात्र कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवायाची याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महापालिकेत सत्ता आणू :
मुंबई महापालिका निवडणूक हा विषय आमच्यासाठी आव्हानात्मक असून, महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदेंच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सहकार्याने महापालिकेवर सत्ता आणू. असेही ते म्हणाले.

Back to top button