लोकसभा-विधानसभा स्वतंत्र चिन्हावर लढणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टीकरण | पुढारी

लोकसभा-विधानसभा स्वतंत्र चिन्हावर लढणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टीकरण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिकांच्या निवडणुका रिपाइंचे उमेदवार भाजपच्या कमळ या चिन्हावर लढतील, मात्र लोकसभा आणि विधानसभेची निवडणुक आम्ही कमळ या चिन्हावर न लढता स्वतंत्र चिन्ह घेऊन लढणार आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात दिले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी आयोजित केलेल्या वार्तालापामध्ये आठवले बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, सरचिटणीस पांडूरंग सरोदे, खजिनदार अभिजीत बारभाई यांच्यासह रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, भाजप सोबत आमची युती असल्याने महापालिका निवडणुकीसाठी पुणे शहरात आम्ही 25 जागांची मागणी करणार आहोत. या जागांवर आम्ही भाजपच्या कमळ या चिन्हावरच लढणार आहोत. तसेच लोकसभेच्या आणि विधानसभेच्याही जागांची मागणी भाजपकडे केली जाणार आहे. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुक रिपाइं स्वतंत्र चिन्ह घेवून लढेल. सध्या राज्यात 20 मंत्री आहेत. रिपाइंला एक मंत्रीपद आणि राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये एक जागा मिळावी, अशी मागणी, केल्याचेही आठवले यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असून त्यांच्या गटाचे आमदार आणि खासदार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढतील. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा नवीन चिन्ह घेवून लढावे लागेल. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा अट्टाहास धरून नको ते केले. त्यामुळे शिवसेनेत फूट पडली. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा नैतिक अधिकार शिंदेंना आहे, उद्धव ठाकरेंना नाही. त्यांनी इतर मैदानात मेळावा घ्यावा, असेही आठवले म्हणाले.

… तर मुंबईत रिपाइंचा महापौर असेल

शिवसेनेला मुंबई महापालिका मधून हटविण्याचा आम्ही चंग बांधला आहे. महापालिकेच्या गतनिवडणुकीत भाजप-रिपाइं युतीने 82 जागा जिंकल्या होत्या. आगामी निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे. यावेळी रिपाइंला मुंबईत उपमहापौर मिळेल आणि आरक्षण पडल्यास महापौरपद मिळेल, असेही आठवले म्हणाले.

Back to top button