

Stock Market Updates : जागतिक संकेत कमकुवत आहेत. त्यात आज संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशातील जीडीपी वाढ ६ ते ६.८ टक्के राहील असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आला. हा अहवाल सादर होण्यापूर्वी शेअर बाजाराने मंगळवारी (दि.३१) तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २७० अंकांनी वाढून ५९,७७० वर गेला. तर निफ्टी १७,६०४ वर गेला होता. पण दोन्ही निर्देशांकांनी काही क्षणांत तेजी गमावली. सकाळी ९.४५ च्या सुमारास सेन्सेक्स २५० अंकांनी खाली आला. एकूणच दिवसभर दोन्ही निर्देशांकांनी स्थिर पातळीवर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ४९ अंकांच्या किरकोळ वाढीसह ५९,५४९ वर बंद झाला. तर निफ्टी १७,६७५ वर स्थिरावला.
आज चौथ्या सत्रातही अदानी समूहातील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारातही अदानींचे शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले. अदानींच्या १० शेअर्सपैकी ८ शेअर्संनी निगोटिव्ह झोनमध्ये व्यवहार केला. अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन ॲनर्जी शेअर्सने मंगळवारी ५२ आठवड्यांची निच्चांकी पातळी गाठली. अदानी पॉवर, अदानी विल्मर हे शेअर्स कोसळले. (Stock Market Updates)
एनडीटीव्ही, अदानी पॉवर, अदानी विल्मर हे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरले आहेत. तर अदानी टोटल गॅस शेअर १० टक्क्यांनी खाली येऊन २,११२ रुपयांवर आला. अदानी एंटरप्रायजेस हा शेअर २ टक्क्यांनी वधारल्याचे दिसून आले. गेल्या तीन दिवसांत अदानी शेअर्सच्या घसरणीमुळे त्यांचे बाजार मुल्य ५.१७ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. अदानी समूह (Adani Group) गेल्या अनेक वर्षापासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉड करत असल्याचा दावा अमेरिकेतील शॉर्ट- सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने त्यांच्या अहवालातून केला होता. यामुळे अदानींचे शेअर्स धडाधड कोसळत आहेत.
आजच्या व्यवहारात आयटी शेअर्स घसरले. यात टेक महिंद्राचे सर्वाधिक नुकसान झाले. हा शेअर सुमारे ३ टक्क्यांनी घसरला. कोफोर्ज, Mphasis, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीस, विप्रो हे आयटी शेअर्स खाली आले. दरम्यान, मेटल स्टॉक्स आज वधारलेले दिसून आले. यात JSW Steel, जिंदाल स्टील, टाटा स्टील यांचा समावेश होता.
गेल्या दोन महिन्यांत निव्वळ खरेदीदार राहिलेल्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) जानेवारीमध्ये विक्रीवर जोर दिला. उद्या (बुधवार) केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यापूर्वी जानेवारी महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे भारतीय शेअर्सची विक्री केली. परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे देशांतर्गत इक्विटी बाजार निर्देशांकांवर दबाव राहिला आहे. तात्पुरती आकडेवारीनुसार, या महिन्यातील बहुतांश दिवसांत FII हे निव्वळ विक्री करणारे होते. परदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी एका दिवसात ६,७९२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.
भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला आहे. मंगळवारी उशिरा दुपारच्या व्यवहारात डॉलर निर्देशांकाने उसळी घेतली. रुपया प्रति डॉलर ८२.०५ पर्यंत खाली आला आहे. १० जानेवारीपासूनची त्याची ही निचांकी पातळी आहे. तो आज ८१.५८ वर खुला झाला होता. सकाळी परदेशी बँकांकडून डॉलरची झालेली खरेदी आणि डॉलर निर्देशांकातील मजबूतीमुळे रुपया कमकुवत झाला आहे.
हे ही वाचा :