Hate Speech : गुन्हा दाखल करण्यासाठी पाच महिने वेळ का लावला, सर्वोच्च न्यायालयाची विचारणा | पुढारी

Hate Speech : गुन्हा दाखल करण्यासाठी पाच महिने वेळ का लावला, सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – सुदर्शन टीव्हीचे संपादक सुरेश चव्हाण यांच्याशी संबंधित हेट स्पीच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पाच महिन्याचा विलंब का लावला तसेच तपासात आतापर्यंत कोणती प्रगती झाली, (hate speech) अशी विचारणा करीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शुक्रवारी दिल्ली पोलिसांची खरडपट्टी काढली. (hate speech)

हिंदू युवा वाहिनीने डिसेंबर २०२१ मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान सुरेश चव्हाण यांनी हेट स्पीच दिल्याचा आरोप आहे. यासंदर्भात तुषार गांधी यांनी तक्रार केली होती. याचिकेची दखल घेत सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने दोन आठवड्याच्या आत तपासाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यास दिल्ली पोलिसांना सांगितले.

‘तपासात आतापर्यंत तुम्ही काय केले‘, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांना सुनावले.

घटना १९ डिसेंबर, २०२१ ची आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पाच महिन्याचा वेळ लागतो का, अशी विचारणा चंद्रचूड यांनी केली.  यावर जाणूनबुजून उशीर लावण्यात आलेला नसल्याचे नटराज यांनी सांगितले. यावर आतापर्यंत कोणकोणती पावले उचलली गेली, किती लोकांना अटक करण्यात आली, कितपत तपास झाला, याची सविस्तर माहिती द्या, असे चंद्रचूड यांनी सांगितले.

Back to top button