Share Market Updates : आजच्या शुक्रवारच्या व्यवहारात शेअर बाजारातील सेन्सेक्स, निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली होती. पण दुपारच्या सत्रात या घसरणीला ब्रेक लागला आणि सेन्सेक्सने निच्चांकावरुन ७०० अंकांची वाढ नोंदवत उसळी घेतली. सकारात्मक जागतिक संकेत तसेच अमेरिका आणि भारतातील महागाई नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह आशियाई बाजारात तेजीचे वातावरण राहिले. पण भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात लाल रंगात न्हाऊन निघाले होते. ऑटो, फायनान्शिअल, एफएमसीजी आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली होती. सकाळी १० च्या सुमारास बीएसई सेन्सेक्स ३११ अंकांनी घसरून ५९,४०० वर तर निफ्टी १७,७०० वर होता. दुपारी २ वाजता सेन्सेक्सने घसरण थांबवत ४०० अंकांनी वाढून उसळी घेतली. तर निफ्टी १८ हजारांजवळ होता. त्यानंतर सेन्सेक्स ३०३ अंकांच्या वाढीसह ६०,२६१ वर बंद झाला. तर निफ्टी ९८ अंकांनी वाढून १७,९५६ वर स्थिरावला. यामुळे दोन्ही निर्देशांकांची ३ दिवस झालेली घसरण आज थांबली.
सकाळच्या व्यवहारात एचडीएफसी, एल अँड टी, रिलायन्स, सन फार्मा, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि एम अँड एम यांचे शेअर्स घसरले होते. टाटा स्टील, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, एनटीपीसी आणि एसबीआय यांचे शेअर्स वाढले होते. त्यानंतर दुपारी २ वाजता बाजारात तेजी आल्यानंतर इन्फोसिस, इंडसइंड, टाटा स्टील, मारुती, आयसीआयसीआय, टीसीएस, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, एचडीएफसी, आयटीसी, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड, कोटक बँक, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, रिलायन्स या शेअर्संनी हिरव्या रंगात व्यवहार केला.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल), इन्फोसिस, टाटा स्टील, एचसीएल टेक, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, पीएनबी, आयसीआयसीआय बँक आणि पेटीएम हे NSE निफ्टीवरील सर्वात सक्रिय शेअर्स होते.
एचसीएल टेक (HCL Tech) शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात घसरले होते. त्यानंतर बाजारातील दुपारच्या तेजीनंतर एचसीएल टेकने नुकसान भरून काढले आणि त्यांनी सकारात्मक व्यवहार केला. या आयटी दिग्गज कंपनीचा शेअर सुरुवातीला ३ टक्क्यांनी घसरला होता. त्यानंतर तो ०.७१ टक्क्यांनी वाढून १,०७९ रुपयांवर पोहोचला. या शेअरने निचांकी १,०४२ रुपये आणि उच्चांकी १,०८१ रुपयांवर व्यवहार केला.
डिसेंबरमध्ये ग्राहकपयोगी किमतींमध्ये घसरण दर्शविणारा डेटा समोर आला आहे. यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून कमी व्याजदरवाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक उच्च पातळीवर व्यवहार करुन बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज २१७ अंकांनी वाढून ३४,१९० वर, एस अँड पी ५०० निर्देशांक १४ अंकांनी वाढून ३,९८३ वर आणि नॅस्डॅक कंपोझिट ६९ अंकांनी वधारून १,१११ वर पोहोचला.
शुक्रवारी बहुतांश आशियाई शेअर्समध्ये तेजी होती. अमेरिकेतील महागाई कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. तसेच जपानचे अधिकृत चलन येन सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.८ टक्के वाढून सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. या निर्देशांकाने सलग तिसऱ्या आठवड्यात नफ्याच्या दिशेने वाटचाल केली. चीनचा शांघाय कंपोझिट इंडेक्स शुक्रवारी ३१.८६ अंकांनी वाढून ३,१९५ वर बंद झाला. हाँगकाँगचा हँग सेंग २२४.५६ अंकांनी वाढून २१,७३८ वर आला तर जपानचा निक्केई ३३० अंकांनी घसरून २६,११९ वर आला.
डिसेंबरसाठी भारतातील किरकोळ महागाई दर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सहिष्णुतेच्या पातळीपेक्षा सलग दुसऱ्या महिन्यात खाली आला आहे. यामुळे मोठ्या व्याजदरवाढीची चिंता कमी झाली आहे. आरबीआयने गेल्या महिन्यात रेपो दरात ३५ बेसिस पॉईंट्सने वाढ केली होती.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) काल १,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. तर जानेवारीत आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण १५ हजार कोटींची गुंतवणूक बाजारातून काढून घेतली आहे. (Share Market Updates)
हे ही वाचा :