

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्रात यापूर्वीही अशी प्रकरणे घडली आहेत. पण आमच्याकडे लपविण्यासारखे काहीच नाही. पण इतके घाणेरड्या प्रकारचे राजकारण आम्ही आत्तापर्यंत पाहिले नाही. महाराष्ट्रात सध्या ईडी सरकार कार्यरत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल (कोल्हापूर) आणि पुणे येथील घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या, शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय विरोधी राजकीय नेत्यांची हेडलाईन होत नाही. त्यामुळे ही कारवाई राजकीय सुडबुद्धीने करण्यात आली असल्याचेही त्या म्हणाल्या. या सुडाच्या राजकारणाचे संबंधित नेत्यांच्या कुटूंबियांना होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे आणि गडहिंग्लज कारखान्यातील आर्थिक घोटाळ्याबाबत आरोप केले होते. किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबरला ट्विट करत २०२३ या नव्या वर्षात आपले नवे निशाणे कोण असणार याची माहिती दिली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.