राजकीय सुडापोटी विरोधकांना त्रास दिल्यास सहन करणार नाही : अजित पवार | पुढारी

राजकीय सुडापोटी विरोधकांना त्रास दिल्यास सहन करणार नाही : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील सरकार नको तो वाद उकरून मूळ विषयावरून लोकांचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न करत आहे. खोटे गुन्हे दाखल करून विरोधकांना अडचणीत आणले जात आहे. परंतु विरोधकांना विनाकारण त्रास दिल्यास आम्हीही आमची आयुधं वापरू. राजकीय सुडापोटी कारवाई करण्यासाठी सरकारकडून विरोधकांना गोवण्याचा प्रयत्न झाल्यास कदापी सहन करणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला दिला. ते आज (दि.१०) पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विरोधकांवर राजकीय सुडापोटी कारवाई करणे चुकीचे आहे. ही मोघलाई लागली आहे का? याविरोधात उठाव होईल, खालच्या पातळीवर राजकारण करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्हीही आयुधांचा वापर करू, असा इशारा सरकारला दिला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले की, अशा लोकांवर प्रतिक्रिया देण्यास माझ्याकडे वेळ नाही. त्यांचे डिपॉझिट जप्त करून परत पाठवले आहे. तर भाजप आमदार नितेश राणे यांना उत्तर देण्यास बांधील नाही, असे ते म्हणाले.

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबत चर्चा करून नावे जाहीर करण्यात येतील. महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना होण्याची गरज आहे. कारण अर्थसंकल्पात त्या समाजाला न्याय देण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. शिष्यवृती, योजना, निधी देताना याचा उपयोग होऊ शकतो. सर्व जातीधर्माला न्याय मिळाला पाहिजे. शिंदे – ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. परंतु यामध्ये तारीख पे तारीख दिली जात आहे. मात्र, यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. निकाल कधी द्यायचा याचा अधिकार न्यायालयाला आहे. परंतु, लवकरात लवकरात निकाल द्यावा, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button