ICICI bank-Videocon loan fraud case | आयसीआयसीआय बँक कर्ज फसवणूक प्रकरणी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांची तुरुंगातून सुटका | पुढारी

ICICI bank-Videocon loan fraud case | आयसीआयसीआय बँक कर्ज फसवणूक प्रकरणी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांची तुरुंगातून सुटका

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आयसीआयसीआय- व्हिडिओकॉन बँक कर्ज फसवणूक प्रकरणी (ICICI bank-Videocon loan fraud case) आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) चंदा कोचर यांची भायखळा कारागृहातून आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची आज मंगळवारी (दि.१०) आर्थर रोड कारागृहातून सुटका करण्यात आली. चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला होता. या बँकेतील कथित कर्ज घोटाळाप्रकरणी सीबीआयने गेल्या २३ डिसेंबर रोजी या दाम्पत्याला अटक केली होती. त्यानंतर व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

उच्च न्यायायालयाने आपल्या आदेशात चंदा कोचर यांची अटक अवैध असल्याचा ठपका ठेवला. त्यांची अटक ही कायद्यानुसार नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना नोंदवले होते.

चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेतील उच्चपदावर असतानाच्या काळात व्हिडिओकॉन कंपनीला नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आले होते. व्हिडिओकॉनला कर्ज देणाऱ्या बॅंकेच्या समितीत चंदा कोचर यांचा समावेश होता. कर्ज वाटप करण्याच्या बदल्यात व्हिडिओकॉनने चंदा कोचर यांच्या पतीच्या न्यू रिन्यूएबल नावाच्या कंपनीत ६४ कोटींची गुंतवणूक केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. न्यू रिन्यूएबलमध्ये दीपक कोचर यांची ५० टक्क्यांची हिस्सेदारी आहे. विशेष म्हणजे याआधी सप्टेंबर २०२० मध्ये ईडीने दीपक कोचर यांना अटक केली होती.

तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या कर्ज वाटप घोटाळाप्रकरणी ईडीने याआधी चंदा कोचर यांच्यावर हवालाचा गुन्हाही दाखल केला होता. तर वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआयने २०१९ साली गुन्हा दाखल केला होता. मुख्य आरोपींमध्ये सामील असलेल्या कोचर दांपत्याला सीबीआयने अटक केली होती.

कर्जवाटप घोटाळा उघडकीस आल्यानंतर २०१८ साली चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बँकेतून राजीनामा द्यावा लागला होता. तत्पूर्वी फेब्रुवारी २०१८ मध्ये सीबीआयने यासंदर्भात प्राथमिक तपास अर्थात पीई दाखल केले होते. घोटाळ्याच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्या. बी. एन. श्रीकृष्णा समितीने वर्ष २०१९ मध्ये आपला अहवाल दिला होता. चंदा कोचर यांनी बॅंकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका समितीने अहवालात ठेवला होता. (ICICI bank-Videocon loan fraud case)

हे ही वाचा :

Back to top button