मुंबई : मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल | पुढारी

मुंबई : मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते कुर्ला आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते नेरुळ, पनवेल दरम्यानची लोकल वाहतुक आज ( दि. ८ ) मेगाब्लॉकमुळे बंद होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सायंकाळी पाच वाजल्यानंतर ‘सीएसएमटी’ ते पनवेल दरम्यानची वाहतूक सुरु झाली, तोपर्यत सीएसएमटीसह हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी झाली होती.

उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. परंतु या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मात्र अतोनात हाल होतात. रविवारी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला लोकल सेवा बंद होता. या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कर्ला दरम्यान लोकल सेवा सुरु ठेवण्यात आली होती.परंतु कुर्ला ते पनवेल लोकल दर २० ते २५ मिनिटांनी चालविण्यात येत होती. त्यामुळे प्रवाशांची गाड्यांना एकच गर्दी झाली होती.

सीएसएमटीला येणाऱ्या प्रवाशांना कुर्ला स्थानकात उतरुन मेन लाईनने लोकल प्रवास करावा लागत होता. परंतु रविवार वेळापत्रकामुळे आधीच लोकलची संख्या कमी होती. त्यात भर म्हणून अनेक लोकल रद्द केल्या होत्या,तर काही लोकल उशिराने धावत असल्याने कुर्ला स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी ,नेरुळ,पनवेल लोकल बंद होती. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. प्रवाशांना ठाणे ते कुर्ला असा उलटा प्रवास करुन पुन्हा कुर्ला स्थानकातून वाशी,नेरुळ,पनवेलला जाण्यासाठी लोकल पकडावी लागली. त्यामुळे प्रवाशांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागला.

हेही वाचा : 

 

Back to top button