सावित्रीबाई फुलेंचा चुकीचा उल्लेख केल्यानंतर अजित पवार यांच्याकडून दिलगीरी | पुढारी

सावित्रीबाई फुलेंचा चुकीचा उल्लेख केल्यानंतर अजित पवार यांच्याकडून दिलगीरी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील कार्यक्रमात भाषण करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याचा उल्लेख क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर असा केला होता. याबाबत अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

पुणे येथील कार्यक्रमात भाषणावेळी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब’ या महामानवांचे स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ ऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाला. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांचे कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाल्यानंतर विरोधकांनी पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. अजित पवारांकडून सावित्रीबाई ‘होळकर’ असा उल्लेख झाल्याने भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत माफी मागण्याची मागणी केली होती.

वाचाळवीर अजित पवार यांनी आधी संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असे म्हणत हिंदूंच्या भावना दुखावल्या आता क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा अपमान केला. आतातरी माफी मागणार की मग्रूरपणे ठाम राहणार, असा सवाल उपस्थित करत आचार्य भोसले यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

हेही वाचंलत का?

Back to top button