Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांना धक्का; काँग्रेस सोडून गेलेल्या १७ काश्मिरी नेत्यांची घरवापसी | पुढारी

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांना धक्का; काँग्रेस सोडून गेलेल्या १७ काश्मिरी नेत्यांची घरवापसी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचा जम्मू-काश्मीर राज्यात प्रवेश होण्याआधीच काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आज (दि. ६) पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्यासह काँग्रेस पक्ष सोडणारे ते नेते आहेत. तारा चंद यांच्याशिवाय काँग्रेसमध्ये परतणाऱ्या इतर प्रमुख नेत्यांमध्ये माजी मंत्री पीरजादा मोहम्मद सईद, माजी आमदार बलवान सिंग आणि गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक आझाद पार्टीचे (डीएपी) जम्मू जिल्हा अध्यक्ष विनोद शर्मा यांचा समावेश आहे.

काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, येत्या २ आठवड्यांनंतर काँग्रेसची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच काँग्रेस सोडून गेलेले जुने काँग्रेस नेते या यात्रेत सहभागी होऊन पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत. 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा 30 जानेवारीला जम्मू-काश्मीरमध्ये संपेल. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या विचारसरणीला पाठिंबा देणारा प्रत्येक व्यक्ती या यात्रेत सामील झाला आहे. (Ghulam Nabi Azad)

जम्मू आणि काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद, मोहम्मद सईद हे तीन वेळा मंत्री राहिले आहेत, ठाकूर बलवंत सिंग, माजी आमदार आणि 17 मोठे नेते काँग्रेसमध्ये परतले आहेत. ते म्हणाले की, गुलाम नबी आझाद धर्मनिरपेक्ष आहेत की नाही, ते तुम्हीच ठरवा. फारुख अब्दुल्ला याआधीच राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी झाले आहेत. ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेतेही यात्रेत सहभागी होणार आहेत. देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात आम्ही सर्व नेते आणि पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहोत, असे ते म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button