वांद्रे येथील अनिल परब यांच्या कार्यालयावर हातोडा? किरीट सोमय्या यांचा दावा | पुढारी

वांद्रे येथील अनिल परब यांच्या कार्यालयावर हातोडा? किरीट सोमय्या यांचा दावा

घाटकोपर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते आमदार माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचे वांद्रे म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक ५७ व ५८ या ठिकाणी असणाऱ्या मोकळ्या जागेतील जनसंपर्क कार्यालयावर कारवाई होणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. हे कार्यालय अनाधिकृत असून ते पाडण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हाडाला तक्रार केली होती.

तसेच या संपूर्ण प्रकरणांमध्ये काही वर्षांपूर्वी किरीट सोमय्या यांनी हे कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्याची मागणी करणारी याचिका लोकायुक्तांपुढे सादर केले होती. त्यानंतर म्हाडाने अनिल परब यांना २७ जून व २२ जुलै २०१९ रोजी दोन वेळा नोटीस बजावून बांधकाम पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, त्यावेळी अनिल परब यांनी बांधकाम पाडलं नव्हतं. त्यानंतर सरकार बदललं आणि म्हाडाकडून ते बांधकाम पाडण्यात आले नाही.

याच दरम्यान अनिल परब यांच्यावतीने हे बांधकाम अधिकृत करण्यात यावे अशा पद्धतीचा प्रस्ताव म्हाडाला देण्यात आला होता. मात्र म्हाडाने हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यानंतर आता सरकार बदलल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा हे बांधकाम पाडण्यात यावे अशा पद्धतीचे पत्र म्हाडाला लिहिल होत. यावर गुरुवार (दि ५ ) रोजी दुपारी म्हाडाने कारवाईचे आदेश काढले असल्याची आणि २६ जानेवारीच्या आधी हे बांधकाम निष्कासित होणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी पत्रकारांना दिली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button