निपाणी : यमकनमर्डीजवळ 40 प्रवाशांची बस पेटली, सुदैवाने… | पुढारी

निपाणी : यमकनमर्डीजवळ 40 प्रवाशांची बस पेटली, सुदैवाने...

निपाणी; पुढारी वृत्तसेवा: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमकनमर्डी हद्दीत खानापूर गेटनजीक हंचीनाळ दर्गाजवळ धावत्या बसला शॉर्टसर्किटने आग लागली. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. दरम्यान वेळीच अग्निशमन तसेच रस्ते देखभाल अशोका कंपनीच्या भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने बसमधील चालक वाहकासह ४० प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. हा बर्निंग बसचा थरार सुमारे अर्धा तास सुरू होता. त्यामुळे महामार्गावरून ये-जा जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीत वित्तहानी झाली नसली तरी बसचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले.

राज्य परिवहन मंडळाच्या संकेश्वर आगाराची ही बस सातारा येथून बेळगावकडे जात होती. ही बस महामार्गावर हंचीनाळ दर्गा येथे आली असता बसच्या पुढील भागाला (बॉनेटला) अचानकपणे आग लागली. ही घटना लक्षात येतात चालक जी. बी. हुगार यानी प्रसंगांना राखीत बस जागीच थांबवली. यावेळी प्रवाशांनी साहित्यासह सतर्कता राखीत बसमधून बचावात्मक पवित्रा घेत आपली सुटका करून घेतली.

दरम्यान या घटनेची माहिती मिळतात तातडीने यमकनमर्डी अग्निशमन विभागाचे कर्मचारी एम. ए. काझी, एम. एस. शिंगणावर, सिकंदर गोकाक, प्रकाश बुरुड, शंकर बुमनाळ यांच्यासह रस्ते देखभाल अशोका कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अशोक बनगारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणत होते. तर रस्ते देखभाल भरारी पथकाचे कर्मचाऱ्यांनी प्रवासी वर्गांची विचारपूस करून त्याना धीर दिला. दरम्यान घटना यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे सीपीआय रमेश छायागोळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये दोन प्रवाशांना किरकोळ भाजले गेले असल्याची माहिती छायागोळ यांनी दिली.

हेही वाचा : 

Back to top button