शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र विक्रीस काढला आहे का? : नाना पटोले यांचा सवाल | पुढारी

शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र विक्रीस काढला आहे का? : नाना पटोले यांचा सवाल

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महावितरण कंपनीवर खासगी कंपन्यांचा डोळा असून या कंपनीचे खाजगीकरण होऊ नये म्हणूनच राज्यातील वीज कंपन्यांचे कर्मचारी संपावर गेले आहेत. महावितरण ही महत्वाची तसेच फायद्यात असलेली कंपनी अदानीसारख्या खासगी उद्योगपतीच्या घशात घालण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा डाव आहे. महावितरणचे खाजगीकरण सुलभ व्हावे यासाठीच अंबानी-अदानीच्या मुलांची राज्याच्या आर्थिक सल्लागार मंडळावर निवड केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रच विक्रीस काढला आहे का ? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पटोले म्हणाले की, महावितरणच्या खाजगीकरणला विरोध करत कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांनी तीन दिवसांचा पुकारलेला संप सरकारला टाळता आला असता. दोन महिन्यांपासून कर्मचारी संघटना मागणी करत होत्या. पण सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आता संप सुरु झाला आणि महाराष्ट्र अंधारात बुडाल्यानंतर सरकार चर्चेचे नाटक करत आहे. आधीच चर्चा केली असती तर महाराष्ट्रातील जनतेचे हाल झाले नसते. शहरी भागातील वीज वितरण ताब्यात घेऊन खासगी कंपनी नफेखोरी करणार. यामुळे ग्रामीण भागातील सामान्य जनतेला व शेतकरी यांना मिळणारी सवलतीच्या दरातील वीज बंद होईल. महागडी वीज शेतकरी व ग्रामीण जनतेला परवडणारी नाही. पण भाजप सरकारला जनतेचे देणे घेणे नाही. देश विकून देश चालवणारे हे सरकार आता महाराष्ट्र विकायला निघाला आहे. देशातील सर्वात महत्वाचे असलेले मुंबई विमानतळ व आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीच्या घशात घातला. आता महावितरणही अदानीच्याच घशात घालण्याचा हा डाव आहे. वीज कर्मचाऱ्यांचा हा संप त्यांनी पगारवाढ किंवा त्यांच्या फायद्यासाठी केलेला नाही, तर सामान्य वीज ग्राहकांना भविष्यात त्रास होऊ नये म्हणून केला आहे, आमचा त्यांना पाठिंबा आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा १.५४ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पासह इतर महत्वाचे प्रकल्प गुजरातला भेट देऊन महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान केले. लाखो तरुणांचे रोजगारही गेले. उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढावी यासाठी ४ व ५ जानेवारीला योगी आदित्यनाथ हे मुंबईत येत असून उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील महत्वाच्या लोकांशी ते चर्चा करणार आहेत. आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी खोके सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू जनतेने लक्षात घ्यावा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे.

Back to top button