Ajit Pawar : महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई कधी?, अजित पवारांचा सवाल | पुढारी

Ajit Pawar : महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई कधी?, अजित पवारांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ष २०२२ अर्थसंकल्प सादर करताना स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख केला. याबाबत विकास आराखडा मंजूर झाला, जीआर निघाला त्यात ही स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असाच उल्लेख होता. मी कसलेही वादग्रस्त विधान केले नाही, राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. (Ajit Pawar)

गेले काही दिवस विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल स्वराज्यरक्षक असा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यानिमित्ताने अजित पवार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलताना म्हणाले, “मला विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीच्या आमदारांनी केले आहे. इतरांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. भाजपने मला विरोधी पक्षनेतेपद दिलेले नाही? माझ्याकडून राजीनामा मागण्यापेक्षा ज्यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्यांना विचारा. मी केलेल्या भाषणानंतर सातत्याने घटना घडल्या.

या भाजप नेत्यांवर कारवाई कधी?

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी मीच पाठपुरवठा केला. 14 मे ला 1657 ला पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. हा दिन बाल शौर्यदिन साजरा केला जावा याबद्दल आग्रही राहिलो. 26 डिसेंबर रोजी मी महाराजांबद्दल बोलत असताना महापुरुषांच्या स्त्रियांच्याबद्दल चुकीचे बोललेलो नाही. मात्र, राज्यपालांनी अपशब्द वापरले. महापुरुषांचा अपमान मंत्री महोदयांकडून झाला आहे. मी कधीच बेताल वक्तव्य केले नाही. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या या भाजप नेत्यांवर कारवाई कधी? असाही सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थिती केला.

तर राजकारण सोडून देईन

माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) पुढे असेही म्हणाले, मी सभागृहात बोललो तेव्हा  कुणी आक्षेप घेतला नाही. त्यावेळी मास्टर माईंड सभागृहात नव्हता नंतर आंदोलन करण्याचे नियोजन झाले. मी कसलेही वादग्रस्त विधान केलेले नाही, राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. मी महापुरुषांचा कधीही अपमान केला नाही, तसे तुम्ही सिद्ध केले तर राजकारण सोडून देईन.  संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक हे विधान विधानसभा कामकाजातून काढण्याचा संबंध येत नाही असेही ते म्हणाले.

जोगेंद्र कवाडे यांनी शिंदे यांच्या सोबत आघाडी केली. यावर बोलताना ते म्हणाले, जोगेंद्र कवाडे यांनी शिंदे यांच्या सोबत आघाडी केली तो त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठले मित्रपक्ष घ्यायचे ते आघाडीतील प्रत्येक पक्षाला अधिकार आहे, त्यानुसार काॅंग्रेस, एनसीपी आणि शिवसेना त्याच्या त्याच्या कोट्यातून चर्चेअंती जागा सोडेल. त्याचबरोबर एका कॉन्ट्रक्टरला ५ कोटीचे ३०० कोटी द्यावे लागले त्या प्रकरणात काही अधिकारी सामील होते त्यांची चौकशी करा ही मागणीही यावेळी त्यांनी केली.

द्वेषाचं राजकारण मला मान्य नाही

आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य असं बरचं येत. मी माझी भूमिका मांडली ज्यांना योग्य वाटतं ते त्यानी स्वीकारावं. मी काही इतिहासतज्ज्ञ नाही आहे, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. भाजपने माझ्याविरोधात आंदोलन करण्यासाठी प्रोेत्साहन दिलं. सूडबबद्धीने राजकारण केलं जात आहे. द्वेषाचं राजकारण मला मान्य नाही आहे.

हेही वाचा

Back to top button