

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आज (दि.४) सकाळपासूनच शहरातील अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू झाला, तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुसरीकडे संपकाळात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी परराज्यातून २७५ कर्मचाऱ्यांचे आऊटसोर्सिंग करण्यात आले आहे. आऊटसोर्सिंग केलेले कर्मचारी हे रात्रीच शहरात दाखल झाल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी दिली.
महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी मंगळवारी (दि.३) मध्यरात्रीपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे.
संपामध्ये औरंगाबाद परिमंडलातील सुमारे ४ हजार ५०० अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात शिपाई ते अतिरिक्त कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कार्यकारी अभियंते व मुख्य अभियंत्यांनीही संपात सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष कृती समितीने केले आहे., असे राज्य समन्वयक अरुण पिवळ यांनी दिली.
दरम्यान, या संपावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (दि.४) दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संप काळात वीजपुरवठा खंडीत होऊन नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आऊटसोर्सिंगचे कर्मचारी २४ तास सेवेत कार्यरत राहणार आहेत.
वीज कर्मचारी दि. ४, ५ आणि ६ जानेवारीला संपावर जाणार असल्यामुळे नागरिकांनी मुबलक पाणी भरून ठेवावे. मोबाईल चार्जिंगसह दळण आणून ठेवण्याची व्यवस्था करावी, असा मॅसेज मंगळवारी सकाळपासूनच सोशल मीडियात फिरत आहे. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याच्या टाक्या, दळण, मोबाईल चार्जिंग आदी कामे उरकून घेतली. तर या मॅसेजमुळे नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
या संपात महावितरणचे ९८ टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. शहरात अनेक भागात विजेचा लंपडाव सुरू झाला आहे. तर ग्रामीण भागातील वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे.
हेही वाचलंत का ?