विमा कंपन्यांकडून नव्या वर्षात ‘पॉलिसी बदल’, जाणून घ्‍या काय होणार बदल

विमा कंपन्यांकडून नव्या वर्षात ‘पॉलिसी बदल’, जाणून घ्‍या काय होणार बदल
Published on
Updated on

2022 ला निरोप देत जगाने 2023 या नव्या वर्षांत पाऊल टाकले. यानिमित्त प्रत्येक जण नवीन उपक्रम, संकल्पना राबविण्याचा प्रयत्न करतो. विमा कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या योजना, सवलत, अन्य आकर्षक ऑफर सादर करण्यात येते. विमा नियामक इर्डाने 2047 पर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत विमा सुविधा पोहोचवण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आणि याद़ृष्टीने नवीन वर्षात योजना सादर केल्या आहेत. अर्थात, नव्या वर्षात विमा क्षेत्रात व्यापक बदल करण्याचे प्रस्ताव आहेत. तूर्त नव्या वर्षात लगेच कोणते बदल होणार आहेत आणि या बदलाचा विमाधारक आणि विमा कंपन्यांवर काय परिणाम होईल, हे जाणून घेऊ. (Insurance Policy )

केवळ डिजिटल मोडवर Insurance Policy मिळणार

नव्या वर्षात विमा पॉलिसी ही केवळ डिजिटल स्वरूपात मिळणार आहे. 'इर्डा' संस्थेने यासंदर्भात विमा पॉलिसी केवळ डिजिटल रूपातच द्यावी, असे निर्देश दिले. या आधारावर सर्व विमाधारकांना आता डिमॅट खाते सुरू करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे शेअर खरेदी करणे, विक्री करण्यासाठी तसेच त्याचे व्यवहार करण्यासाठी डिमॅट खाते आवश्यक असते. त्याचप्रमाणे विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी डिमॅट खाते सुरू करणे बंधनकारक आहे. पॉलिसीला डिमॅट खात्यात डिजिटल मोडमध्ये ठेवल्याने नूतनीकरण करणे, हप्ता भरणे, खरेदी करणे सोयीचे जाणार आहे. देशात अंदाजे 50 कोटींपेक्षा अधिक विमा पॉलिसी असून त्यासाठी डिजिटल रूपात ठेवण्यासाठी डिमॅट खाते सुरू करणे आवश्यक आहे.

सर्वसामान्यांना समजणार पॉलिसीतील बारकावे

नव्या वर्षात विमा कंपन्यांनी विमा सुगम योजना आणली आहे. यानुसार एखाद्या व्यक्तीच्या माथी कोणतीही पॉलिसी माथी मारता येणार नाही किंवा त्याला नाईलाजाने खरेदी करण्याची वेळ येणार नाही. एखादा व्यक्ती आपल्या सोयीनुसार, सुलभतेनुसार पॉलिसीची निवड करू शकतो. विमा सुगमनुसार पॉलिसीतील बारकावे तो सहजपणे समजू शकतो. सध्याच्या काळात एखाद्याला विमा खरेदी करायचा असेल, तर विमा सल्लागार, कंपनीचे संकेतस्थळ, विमा एजंट, ब्रोकर यांची मदत घ्यावी लागते. परंतु, विमा सुगमच्या सुविधेमुळेे विमा खरेदीसाठी मध्यस्थांची गरज भासणार नाही.

हेल्थ इन्शूरन्समध्ये नवजात बाळाला कवच

नव्या वर्षात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आरोग्य विम्यात नवजात बाळालादेखील कवच मिळणार आहे. इर्डाच्या मते, अनेक आरोग्य विमा कंपनीकडून योजनेत नवजात बाळाला सामील केले जात नाही. कंपनीच्या मते, नवजात बाळाला जन्माबरोबर अनेक प्रकारचे आजार राहू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे आकलन करता येत नाही; पण विमा कंपनीचा हा विचार इर्डाने खोडून काढत नवजात बालकाला विमा कवच देण्याचे निर्देश दिले. नवजात बाळाचा विमा कवचमध्ये समावेश न करणे हे एकप्रकारे प्रामाणिकपणाच्या सिद्धांताला तिलांजली देण्यासारखे आहे, असे इर्डाने बजावले आहे.

थर्ड पार्टी विम्याची रक्कम निश्चित

इर्डाच्या निर्देशानुसार विमा कंपन्यांनी आता थर्ड पार्टी विमा हप्ता निश्चित केला. पूर्वी थर्ड पार्टी विम्याचा हप्ता हा संबंधित कंपनीकडून निश्चित केला जायचा. अशावेळी ग्राहक अडचणीत यायचा. विमा नियामकने आता हप्ता निश्चित केला आहे. विम्याचा हप्ता हा इंजिनच्या क्षमतेनुसार निश्चित केला. जसे की 1 हजार सीसीपर्यंत असलेल्या इंजिन क्षमतेच्या वाहनांचा हप्ता 2094 रुपये आहे. याप्रमाणे 1000 सीसी ते 1500 सीसीपर्यंत इंजिनची क्षमता असलेल्या वाहनांसाठी थर्ड पार्टीच्या विम्याचा हप्ता 3416 रुपये निश्चित केला. 1500 सीसीपेक्षा अधिक वाहनांसाठी 7879 रुपये हप्ता, दुचाकी श्रेणीतील वाहनासाठी 75 सीसीपर्यंत 538 रुपये, 75 ते 150 सीसीपर्यंत 714 रुपये, 150 ते 350 सीसीपर्यंत 1366 रुपये आणि 350 सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकी वाहनासाठी 2,604 रुपयांचा हप्ता निश्चित केला आहे.

Insurance Policy : एजंट बदलण्याचा अधिकार

इर्डाकडून विमाधारकांना एजंट पोर्टेबिलिटीचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. यानुसार एखादा विमाधारक हा सल्लागाराच्या सेवेतून समाधानी नसेल, त्याचे व्यवहार मनाला पटत नसतील तर तो आपला सल्लागार/एजंट बदलू शकतो. विमा सल्लागार बदलल्याने हप्त्यातून मिळणारे कमिशन हे नव्या सल्लागाराला मिळेल. सध्या ही सुविधा वीस वर्षांचा कालावधी असलेल्या पॉलिसीधारकांनाच मिळेल. विशेष म्हणजे, विमाधारक हे अनेकदा विमा सल्लागारांना चांगली सेवा देत नसल्याची तक्रार करायचे; पण त्यावर तोडगा निघत नसे. आता ही समस्या दूर होऊ शकते.

विमा खरेदीसाठी कर्ज मिळणार

बंद पडलेली विमा योजना किंवा हप्ता न भरल्याने निष्क्रिय झालेली विमा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी अनेकांकडे एक रक्कमी पैसे नसतात. आता विमा कंपनीकडून अशा विमाधारकांना कर्ज देण्याची सुविधा दिली जाणार आहे. विविध विमा कंपन्या ग्राहकांसाठी विमा हप्ता कर्ज योजना सुरू करत असून त्यानुसार विमा योजना खरेदी करणे सुलभ ठरणार आहे.

कर्जाची रक्कम घेऊन विमाधारक एकरकमी हप्ता भरू शकतात आणि पॉलिसी सक्रिय करू शकतात. त्यानंतर हप्त्याच्या रूपाने विमाधारक कर्जाची फेड करू शकतील.

अनिल विद्याधर

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news