विधानसभा अध्यक्षांबाबत अपशब्द वापरल्याने जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन | पुढारी

विधानसभा अध्यक्षांबाबत अपशब्द वापरल्याने जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी घोषित केल्यानंतर बोलण्यास उभे राहिलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना बोलण्यास अध्यक्षांनी परवानगी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या जयंत पाटील यांनी अध्यक्षांबाबत असला निर्लज्जपणा करू नका, असे सुनावल्याने जयंत पाटील यांच्या निलंबनासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दीड तास कामकाज रोखून धरले होते.

दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी सभागृहात प्रचंड गदारोळात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी जाहीर केली. त्यामुळे विरोधकही आक्रमक झाले. त्यांनी बोलण्याची परवानगी मागितली. शिवसेना सदस्य भास्कर जाधव हे बोलण्याची परवानगी मागत होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिली नाही. त्यावर आक्षेप घेत जयंत पाटील यांनी विरोधकांना अध्यक्ष बोलू देत नाहीत, असे सांगत तुम्ही असला निर्लज्जपणा करू नका, असेअध्यक्षांना सुनावले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतापले. त्यांनी जयंत पाटील यांना आताच्या आता निलंबित करा, अशी मागणी केली. त्यावेळी उडालेल्या गदारोळात सभागृहाचे कामकाज तीनवेळा दीड तासासाठी तहकूब करण्यात आले.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा ठराव मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर जयंत पाटील यांच्याकडून अनावधानाने हा शब्द गेल्याचे सांगत झाल्या प्रकाराबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. अध्यक्षांबद्दल आमच्या मनात आदरच आहे. कोणताही गैरसमज होऊ नये, असे सांगत अजित पवार यांनी हे निलंबन मागे घेण्याबाबत विचार व्हावा, अशी विनंतीही केली. त्यानंतर कोणत्याही चर्चेविना पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

हेही वाचा :  

Back to top button