राहुरी; पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना अद्यापि मदत न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह चौघांनी मुळा धरणाच्या पाण्यात उडी घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केाला. उद्धव ठाकरे शिवसेनेने स्वाभिमानीच्या जलसमाधी आंदोलनाला पाठिंबा दिला. चौघांनी थेट धरणाच्या पाण्यात उडी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. पोलिसांनी अगोदरच बोटीची तजवीज केल्याने पाणबुड्याच्या सहायाने आंदोलकांना तत्काळ पाण्याबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
राज्यामध्ये मान्सून अखेरीस अतिवृष्टी झाली. नगर जिल्ह्यातही अतिवृष्टीसह ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार घातला. शेतकर्यांचा कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. राज्यातील शिंदे-फडणवीस शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले. महसूल, कृषी विभागाने तत्काळ शेतकर्यांच्या बांधावर धाव घेत नुकसानीची सविस्तर माहिती वरिष्ठांना दिले.
दरम्यान, जिल्ह्यातील शेतकर्यांची 33 टक्के पेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल शासनाकडे जमा होऊनही एक पैसाही मदत निधी मिळाला नाही. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोरे यांसह कार्यकर्त्यांनी प्रशासनाला आठवड्यापूर्वीच 20 डिसेंबरपर्यंत शेतकर्यांच्या बँक खात्यावर मदत निधी जमा करा. अन्यथा मुळा धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेऊ असा ईशारा देत तसे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पाटील यांच्याकडे सुपूर्द केले होते.
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 40 हजार रुपयांचा मदतनिधी जमा न झाल्याने स्वाभिमानी संघटनेने हे आंदोलन केले. कोणत्याही परिस्थितीत मुळा धरणाच्या पाण्यात उड्या घेत जलसमाधी घेण्याचा चंग स्वाभिमानीने बांधल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला. खेवरे यांसह धनराज गाडे, बाळासाहेब गाडे, विश्वास पवार, किशोर कोहकडे, प्रकाश देठे, सतिष योगेश करपे, राहुल करपे, सुनिल इंगळे, सतीष पवार, भागगवत मुंगसे, प्रशांत शिंदे, सुनिल शेलार, विजय शिरसाठ, कैलास शेळके, हमीदभाई पटेल, विठ्ठल सुर्यवंशी, राहुल चोथे, सुभाष चोथे, विशाल तारडे, मिनीनाथ पाचारणे यांच्यासह शेकडो आंदोलक मुळा धरणावर जमा झाले.
आंदोलनाची दखल घेत प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांसह शेकडो पोलिसांचा फौजफाटा आधीच धरणावर तैनात होता. 'कोण म्हणतं देत नाही, पीक विमा हक्काचा, पीक विमा न देणार्या शासनाचे खाली डोके वर पाय, यासह जय भवानी, जय शिवाजी', अशा घोषणा देत आंदोलक जलसमाधी आंदोलनावर ठाम होते. प्रांताधिकारी पवार, तहसीलदार शेख हे आंदोलकांशी चर्चा करीत असतानाच चौघांनी गनिमी कावा करत थेट धरणातील पाण्यात उड्या घेतल्या.
कार्यकर्त्यांनी पाण्यात उड्या घेतल्याचे समजताच खेवरे व मोरे यांसह कार्यकर्त्यांनी तिकडे धाव घेताच पालिसांनी धरपकड सुरू केली. पाण्यात उड्या घेतलेल्या आंदोलकांना पाणबुड्यांनी बोटीच्या सहायाने बाहेर काढले. यावेळी पोलिस व आंदोलकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. 'आमचा जीव गेल्याशिवाय गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या शासनाला जाग येणार नाही', असे सांगत आंदोलकांनी पाण्यात उड्या घेऊन द्या असा अट्टहास धरला. मात्र राहुरी पोलिस व राखीव पोलिस दलाने तत्काळ आंदोलकांना ताब्यात घेत धरपकड सुरू केली.
13 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
रावसाहेब खेवरे, रवींद्र मोरे, हमीद पटेल, विशाल तारडे, विठ्ठल सूर्यवंशी, मिनीनाथ पाचारणे, प्रशांत शिंदे, भागवत निमसे, विजय शिरसाठ, कैलास शेळके, सुनील शेलार, सुभाष चोथे, राहुल चोथे या 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात आणत त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी आंदोलकांना सोडून देण्यात आले.
'खोकेमध्ये ओके' झालेल्या शासनाला शेतकर्यांचा विसर पडला आहे. शेतकर्यांच्या हितासाठी सच्चा शिवसैनिक जीव देण्यासही मागेपुढे पाहणार नाही. शेतकर्यांच्या हक्कासाठी हाती घेतलेला लढा मदत मिळेपर्यंत सुरूच ठेवणार.
– रावसाहेब खेवरे,
जिल्हा प्रमुख, ठाकरे सेनाराज्य शासन हे पीक विमा कंपन्यांना पाठीशी घालत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पीक विम्याचे पैसे जमा झाल्याचे सांगत पाठ थोपटून घेत आहेत. विखे यांनी पाठ थोपटून घेण्यापेक्षा नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकर्यांना न्याय द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना हिसका दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
– रवींद्र मोरे,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.