SBI कर्जदारांना मोठा फटका! व्याजदरात आजपासून वाढ, कर्जाचा हप्ता आणखी वाढणार | पुढारी

SBI कर्जदारांना मोठा फटका! व्याजदरात आजपासून वाढ, कर्जाचा हप्ता आणखी वाढणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने निवडक मुदतीवरील कर्जदरात (MCLR) २५ बेसिक पॉइंट्सने वाढ केली आहे. या नव्या MCLR वाढीमुळे कर्जदारांचा मासिक हप्ता (EMI) आणखी वाढणार आहे. नवीन व्याजदर आज १५ डिसेंबर २०२२ पासून लागू झाला आहे. वाहन, गृह आणि वैयक्तिक कर्जासह बहुतांश कर्जे ही एमसीएलआरशी जोडलेली असतात. एमसीएलआर वाढला तर कर्जाच्या मासिक हप्त्याच्या बोजा वाढतो.

एसबीआयच्या माहितीनुसार, एक महिना आणि तीन महिन्यांसाठी एमसीएलआर ७.७५ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. सहा महिने आणि एक वर्षासाठीचा एमसीएलआर (marginal cost of lending rate) ८.०५ टक्क्यांवरून ८.३० टक्के करण्यात आला आहे. दोन वर्षांसाठी एमसीएलआर ८.२५ टक्क्यांवरून ८.५० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. तर तीन वर्षांसाठी एमसीएलआर ८.३५ टक्क्यांवरून ८.६० टक्क्यांवर नेण्यात आला आहे.

SBI ने यापूर्वी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी एमसीएलआरमध्ये वाढ केली होती. त्यावेळी SBI ने सर्व कालावधीच्या कर्जाचा एमसीएलआर १०-१५ बेस पॉइंट्स (bps) ने वाढवला होता. आरबीआयने देशात एमसीएलआर प्रणालीची २०१६ मध्ये सुरूवात केली होती. हा बँकेचा एक बेंचमार्क म्हणून ओळखला जातो. एमसीएलआर प्रणालीनुसार कर्ज देताना किमान व्याजदर निश्चित केला जातो. जर का एमसीएलआर वाढला तर त्याचा फटका ग्राहकांना बसतो. परिणामी कर्जाचा मासिक हप्ता वाढतो.

महागाई हा या दरवाढीचा मुख्य घटक आहे. महागाई २-६ टक्क्यांच्या या श्रेणीच्या खाली येईपर्यंत आरबीआयला इतर महागाई नियंत्रण उपायांव्यतिरिक्त व्याजदर वाढीचा पर्याय वापरावा लागतो. कर्जाचा वाढलेला मासिक हप्ता हा थकित कर्जाची रक्कम, कर्जाची उर्वरित मुदत आणि बँकेद्वारे आकारण्यात येणारा व्याजदर यावर अवलंबून असतो. बँक व्याजदर निश्चित करताना अनेक घटकांचा विचार करते. यामध्ये CIBIL स्कोअर, कर्जदाराचे प्रोफाईल (मग तो नोकरी करत आहेत की नाही, पुरुष किंवा महिला), जोखीम मूल्यांकन, कर्ज ते मूल्य आदी घटकांचा त्यात समावेश असतो.

हे ही वाचा :

 

Back to top button